आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेच्या मतदारांची संख्या निम्म्यावरच:वारंवार आवाहन करूनही टक्का घसरला, 23 नोव्हेंबर नंतर पुन्हा सुरू होणार नोंदणी

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षात होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदारांची एकूण संख्या यावेळी अडीच लाख असेल, असा अंदाज निवडणूक अधिकारी यांनी व्यक्त केला होता. परंतु प्रत्यक्षात गेल्या वेळच्या तुलनेत निम्मे मतदारही नोंदले गेले नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे यंत्रणा नव्याने कामाला लागली असून 23 नोव्हेंबरपासून दावे, हरकती निकाली काढण्यावेळी नवे अर्जही स्वीकारले जातील, असे आयोगाने ठरविले आहे.

अमरावती जिल्हा हा या निवडणुकीचे मुख्य केंद्र आहे. गेल्यावेळी एकूण 2 लाख 10 हजार मतदार होते. त्यापैकी 76 हजार पदवीधर हे एकट्या अमरावती जिल्ह्यातील होते. 20 टक्के नैसर्गिक वाढ या सूत्रानुसार एकूण मतदार नोंदणी ही अडीच लाखावर जाईल आणि त्यात जिल्ह्यातील मतदारांची संख्या किमान 80 हजार असेल, असा अंदाज त्यावेळी निवडणूक अधिकारी या नात्याने विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे व सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी व्यक्त केला होता.

पण, प्रत्यक्षात अमरावती जिल्ह्याची नोंदणी ३५ हजार मतदारांवरच थांबली आहे. त्यामुळे यंत्रणेने अधिक वेगाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला असून ७ नोव्हेंबरला सनदी अधिकाऱ्यांनी काढलेली मतदार जागरुकता सायकल फेरी हा त्याचाच एक भाग होता, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

विधानपरिषदेच्या निवडणूक निमित्ताने मतदार नोंदणीचा कालावधी 7 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला. त्यामुळे मुदतवाढ देऊन उरलेल्या पदवीधरांना मतदार होण्याची संधी द्यावी, अशी सार्वत्रिक मागणी होती. त्या पार्श्वभूमीवर 23 नोव्हेंबरपासून पुन्हा मतदार नोंदणी सुरु केली जाईल, असे आयोगाने कळविले आहे. या निवडणुकीची नोंदणी गेल्या 1 ऑक्टोबरपासून सुरु झाली होती. ती ७ नोव्हेंबरपर्यंत चालेल, हे त्यावेळीच स्पष्ट करण्यात आले होते. परंतु निवडणूक आयोगाच्या ताज्या सूचनांनुसार अमरावतीसह नाशिक पदवीधर मतदारसंघात 23 पासून पुन्हा नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. 1 नोव्हेंबर 2022 या मानीव दिनांकाच्या तीन वर्षांआधी अर्थात 1 नोव्हेंबर 2019 पूर्वीच्या कोणत्याही पदवीधराला सदर निवडणुकीसाठी मतदार म्हणून नाव नोंदविता येईल. देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेल्या परंतु नोकरी, व्यवसाय वा इतर कारणांमुळे येथे अधिवास करणाऱ्या कोणालाही मतदार यादीत नाव नोंदविण्याची मुभा आहे. त्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात नमूना 18 उपलब्ध करुन देण्यात आला असून आवश्यक त्या कागदपत्रांसह पदवीधरांनी आपापले अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहनही यंत्रणेने केले आहे.

….पण तत्पूर्वीच नोंदणी करुन घ्या

निवडणूक आयोगाने केलेल्या तरतुदीनुसार निवडणुकीतील उमेदवारी दाखल होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही मतदार नोंदणी सुरुच असते. परंतु त्या दिवसाची वाट न पाहता आधीच नोंदणी करून घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...