आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशावाद:विकासाची प्रक्रिया अधिकाधिक सर्वसमावेशक, गतिमान : पालकमंत्री; महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी शासनाने अनेक योजना-उपक्रमांना गती देत व समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेत विकासाचा प्रवाह अधिकाधिक सर्वसमावेशक व गतिमान केला आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी रविवार, १ मे रोजी येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय क्रीडा संकुल येथे मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभा खोडके, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री अॅड. ठाकूर म्हणाल्या की आर्थिक सर्वेक्षणानुसार, चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वाढीचा दर ८.९ टक्के राहण्याचा नमूद असताना महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा दर १२.१ टक्के राहील, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात कृषी आणि संबंधित घटकांच्या वाढीबरोबरच उद्योग व सेवा क्षेत्राची वाढ गतीने होत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हाही अनेक क्षेत्रांत राज्यात अव्वल ठरला आहे. संसर्गजन्य साथीच्या निर्मूलनासाठी केवळ तात्कालिक नव्हे, तर कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने कामे होत आहेत. शहरी व ग्रामीण आरोग्य संस्थांचे, तसेच प्रयोगशाळांचे बळकटीकरण अशी अनेक कामे पूर्णत्वास जात आहेत. कोविड प्रतिबंधक लसीकरण ३५ लाखांवर पोहोचले आहे.

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी नांदगावपेठ नजीक जागा निश्चित करण्यात आली असून, लवकरच उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. अमरावती-बेलोरा विमानतळासाठी १४८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळाच्या कामाला गती मिळाली आहे.

महिला व बालविकास विभागाने राष्ट्रीय पोषण महाअभियानात संपूर्ण राज्यातून दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्ह्यातील ५९ स्मार्ट अंगणवाड्या आकारास येत असून, हा उपक्रम राज्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून त्यात विशेष ॲक्टिव्हिटी रुम, तपासणी कक्ष, विशेष किचन आणि वेगळे स्वच्छतागृह असणार आहे. महिला व बालविकास भवनाचे काम प्रगतीपथावर आहे. हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अमरावती पॅटर्न म्हणून राबवण्यात येणार आहे. गुन्हे सिद्धतेत अमरावती शहर पोलिस आयुक्तालय राज्यात दुसरे ठरले आहे, असे सांगून त्यांनी पोलिस प्रशासनाच्या ‘रक्षादीप’, ऑनलाइन सायबर फसवणूक या विषयावर विशेष जनजागृती मोहीम, डायल ११२ हेल्पलाईन आदी उपक्रमांचा उल्लेख आपल्या भाषणात केला.

अमरावती शहर पोलिस, जिल्हा ग्रामीण पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दल, महिला पोलिस पथक, गृहरक्षक दल यांनी पथसंचलन केले. अग्निशमन दल, दंगा नियंत्रण पथक, श्वान पथक, डायल ११२ पथक, दामिनी पथक यांनीही पथसंचलनात सहभाग घेतला. या विविध दलांनी सादर केलेल्या सुंदर पथसंचलनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

बातम्या आणखी आहेत...