आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशंभर वर्षांचे वय हे एखाद्या व्यक्तीसाठी इतिश्री असते पण हेच वय एखाद्या संस्थेचे असेल तर तो त्या संस्थेच्या प्रगल्भतेचा काळ असतो, असे म्हणत शताब्दी वर्षात पोचलेल्या विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेने आता विद्यापीठाकडे वाटचाल करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यासाठी जे-जे लागेल ते करु, अशी ग्वाहीही जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या फडणवीस यांनी दिली आहे.
विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ आज, सोमवारी दुपारी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे-पाटील, सुलभाताई खोडके व अशोक उईके, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्रभारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यान्थन, प्रभारी शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, व्हीएमव्हीच्या संचालिका डॉ. अंजली देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री फडणवीस म्हणाले की, संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेचा आजवरचा इतिहास देदीप्यमान आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे अनेक महापुरुष याच महाविद्यालयात घडले. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी अनेक मोठी व्यक्तिमत्व येथे घडली. संस्थेत विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यात भर घालण्यासाठी शासनाने २५ कोटी रुपये दिले आहेत. परंतु त्यावर समाधान मानू नका. एकल विद्यापीठासाठीही शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. संस्थेने 'आयकॉनिक संस्था' म्हणून विकास करावा. या संस्थेला जेव्हा १२५ वर्षे पूर्ण होतील, तेव्हा संस्थेचा गौरव केवळ विदर्भात नव्हे तर राज्यभर व्हावा, या दृष्टीने प्रयत्न व्हावा, असेही ते म्हणाले.
येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळालाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. रिद्धपुर येथे मराठी विद्यापीठ निर्माण केले जाणार आहे. शिवाय अमरावती येथे लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल. त्यामुळे भविष्यात ‘शैक्षणिक हब’ म्हणून जिल्ह्याचा विकास होत आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण लवचिक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकता येईल. भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय, अभियंत्रिकी शिक्षण घेता येणार आहे, हेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका डॉ. अंजली देशमुख यांनी केले. संस्थेच्या निर्मितीपासून ते आजवर झालेल्या प्रगतीची माहिती त्यांनी दिली.
गुरुला नमन केले
प्रेक्षकांमध्ये माजी विद्यार्थी या नात्याने माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख, डॉ. जहागीरदार आदी मान्यवर उपस्थित होते. त्यापैकी बी.टी. देशमूख यांचा उल्लेख मार्गदर्शक गुरू असा करत फडणवीस यांनी विधीमंडळातील त्यांच्या कामकाजाचा अप्रत्यक्ष गौरव केला. मातोश्रींसह दोघे मामाही येथेच शिकल्याचे सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.