आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Dhamangaon's 94 year old Ganeshotsav, Which Preserves The Heritage Of Sculpture, Is Celebrated By S.F. Installation Of Idols Made By Students In The School

शिल्पकलेचा वसा जपणारा धामणगावचा 94 वर्षांचा गणेशोत्सव:से.फ.ला. महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सेठ फत्तेलाला लाभचंद हायस्कुल (से.फ.ला.) व कनिष्ठ महाविद्यालयात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना तब्बल 94 वर्षाचा इतिहास लाभला आहे. हा गणेशोत्सव विद्यार्थ्यांमध्ये शिल्पकला वृद्धींगत करण्याचा वसा निभावत असून यंदाही विविध कार्यक्रमांसह तो मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सवाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणची मूर्ती ही दरवर्षी शाडू मातीचा वापर करुन विद्यार्थ्यांमार्फत घडवली जाते.

अर्थात निवडक विद्यार्थी गणेशमूर्ती तयार करतात आणि त्यापैकी सर्वोत्कृष्ट गणेश मूर्तीची गणेशोत्सवादरम्यान प्रतिष्ठापना केली जाते. धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय 1914 साली सुरु झाले. येथे 1929 साली तत्कालीन मुख्याध्यापक शंकर भागवत यांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. अशाप्रकारे स्वातंत्र्यपूर्वीचा हा गणेशोत्सव आजतागायत 94 वर्षापासून विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांची समिती तयार करण्यात आली असून या समितीमध्ये संमेलन (गणेशोत्सव) कार्यवाह प्रथमेष दारव्हेकर, सहकार्यवाह मल्हार गंधे, विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रेया पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे.

या समितीसह विद्यालयातील संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे श्री गणेशाची स्थापना केली आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवात मिनिट टू विन इट, भजन स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा, गणपती चित्र सजावट स्पर्धा व इतर मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेशाची मूर्ती दरवर्षी शाडू मातीची तयार करून प्रतिष्ठापित केली जाते. या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृतीचा संदेश दिला. सोबतच कित्येक विद्यार्थी शिक्षक यांनी ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात गणपतीची विद्यालयात स्थापना केली. श्रीगणेशाच्या स्थापनेकरिता विद्यालयाचे प्राचार्य गणेश चांडक, उपप्राचार्य मनोज हांडे, पर्यवेक्षक गोपाल मुंधडा, विद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख विनायक कडू, प्रशांत शेंडे तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोबतच विद्यालयाचे सर्व विद्यार्थी झटत आहेत.

बेस्ट फ्रॉम वेस्ट

से.फ.ला.विद्यालयाचे कलाशिक्षक अजय जिरापुरे हे या विद्यालयात विविध सण, उत्सव प्रसंगी फलकावर चित्र रेखाटन करून विद्यार्थ्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न करतात. या गणेशोत्सवाला त्यांनी फलकावर "गणाधीश" चे चित्र रेखाटन साध्या पांढऱ्या व रंगीत खडूच्या माध्यमातून रेखाटले आहे. सोबतच सजावटीसाठी त्यांनी विविध रंगीत कागदांमधून सुंदर मखर तयार केले आहे. विद्यार्थ्यांची मदत घेऊन हा सुंदर देखावा साकार केला. याला त्यांच्या भाषेत ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...