आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल चौतीस तास चालली. यादरम्यान उमेदवारांची धाकधूक वाढली हार की, जीत असा सामना रंगत असतानाच अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी विजयश्री खेचून आणली. कोटा पूर्ण झाला नसला तरी सर्वाधिक मते प्राप्त झाल्याच्या आधारावर त्यांचा विजय झाल्याचा कौल दिला गेला. त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मते
मतदारांनी दिलेला प्रथम पसंतीक्रम हा निर्धारित मतांएवढा (कोटा) नसल्याने धीरज लिंगाडे व त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. रणजीत पाटील वगळता इतर सर्व २१ उमेदवारांच्या मतपत्रिकेतील दुसरी पसंती तपासण्यात आली. या पसंतीअखेर लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ तर डॉ. पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली होती. कोटा ४७ हजार १०१ मतांचा होता. त्यामुळे लिंगाडे यांना आणखी ७५७ मते हवी होती. परंतु दुसरी पसंती तपासण्यासाठी आता कोणताही उमेदवार शिल्लक नसल्याने सर्वाधिक मते प्राप्त करणारे उमेदवार म्हणून आयोगाने त्यांच्या विजयाची घोषणा करण्यास परवानगी दिली.
१ लाख २ हजार ५८७ मतदान
या निवडणुकीत १ लाख २ हजार ५८७ मतदारांनी मतदान केले. त्यातील ८ हजार ३८७ मते अवैध घोषित करण्यात आली. उर्वरित ९४ हजार २०० मतांच्या आधारे ४७ हजार एक असा कोटा निश्चित करण्यात आला. लिंगाडे यांना पहिल्या पसंतीची ४३ हजार ५१७ तर डॉ. पाटील यांना ४१ हजार १७१ मते मिळाली होती. कोटा कुणीच पूर्ण न केल्याने इतरांच्या मतपत्रिकेतील दुसरी पसंती मोजणे क्रमप्राप्त झाले होते.
विजयाचे प्रमाणपत्र मिळाले
या प्रक्रियेअखेर लिंगाडे यांची मते ही डॉ. पाटील यांच्या मतांपेक्षा ३ हजार ३८२ ने अधिक होती. तर कोटा पूर्ण करण्यासाठी ती ७५७ ने कमी होती. दरम्यान विजयी घोषित झाल्यानंतर लिंगाडे यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी पत्नी पद्मजा, मुलगा सोहम व वेदांत, जावाई, काँग्रेसचे स्थानिक नेते हरिभाऊ मोहोड आणि इतर आप्तस्वकीय उपस्थित होते.
३४ तास चालली मतमोजणी
या निवडणुकीची मतमोजणी ही तब्बल ३३ तास चालली. प्रथम पसंतीची मते जाणून घ्यायलाच पहिले १४ तास खर्च झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने २१ उमेदवारांच्या मतपत्रिकेतील दुसरा पसंतीक्रम जाणून घेण्यात आला. अशाप्रकारे गुरुवारी सकाळी ६ वाजता सुरु झालेली मतमोजणी आज, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता पूर्ण झाली. त्यानंतरचा दीड तास हा आयोगाकडून मान्यता घेण्यासाठी द्यावा लागला. त्यामुळे दुपारी ४ च्या सुमारास लिंगाडे यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.