आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएचओवर ठपका:कोरोना निधीतील अतिरिक्त 8 कोटी परत न केल्याचा डीएचओंवर ठपका

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात प्राप्त झालेला ८ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने परत न केल्यामुळे आरोग्य संचालकांनी डीएचओंना जाब विचारला असून, त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाईचा इशारा दिला आहे. दुसरीकडे या पत्रामुळे जिल्हा प्रशासन ढवळून निघाले असून विविध कार्यालयांमधील अंतर्गत पत्रव्यवहाराला वेग आला आहे.

कोरोना काळात करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी जिल्ह्याचा ३६ कोटी ६७ लाख ५९ हजार रुपयांचा आराखडा राज्य शासनाने मंजूर केला होता. प्रत्यक्षात मात्र या जिल्ह्याला ४४ कोटी ७५ लाख ६१ हजार रुपये देण्यात आले. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत ८ कोटी ८ लाख २ हजार रुपये शासकीय तिजोरीत परत करणे आवश्यक होते. परंतु सदर कार्यालयाने तसे न करता ती रक्कम कोरोना काळातील अतिरिक्त उपाययोजनांवर खर्च केली. मुळात ही रक्कम तातडीने परत करावी, अशी ताकीद वारंवार राज्य शासनातर्फे त्यांना देण्यात आली. आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त तथा एनएचएमचे संचालक डॉ. रामास्वामी एन. यांनी व्हीसीद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधूनही त्यांना ही रक्कम परत करण्यास सांगितले होते. परंतु तरीही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्या कार्यालयामार्फत कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, असे आयुक्तांच्या पत्रात म्हटले आहे.

आरोग्य आयुक्त असतानाच एनएचएम संचालक असलेल्या डॉ. रामास्वामी एन. यांच्या पत्रानुसार डीएचओ कार्यालयाने अद्याप ८ कोटी ८ लाख २ हजार रुपये जमा केले नाहीत. त्यामुळे ही रक्कम जमा का केली नाही आणि विलंब का झाला हे दोन्ही मुद्दे सकारण विचारण्यात आले. या बाबतीत आपला खुलासा असमाधानकारक आढळून आल्यास आपणाविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे म्हटले आहे.

कुषोषण लपवले नाही, आकड्यात चूक झाली
मेळघाटातील कुपोषणाबाबत नुकताच विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावेळी उत्तर देताना आरोग्य मंत्र्यांनी डीएचओ कार्यालयामार्फत प्राप्त आकडेवारीचा पाढा वाचला. परंतु असे करताना त्यांच्यामार्फत चुकीची माहिती पुरवल्याचे सभागृहात स्पष्ट झाले. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर कुपोषण लपवत असल्याचा आरोप केला. आकडेवारी जुळत नसल्याचीही ओरड केली. परंतु प्रत्यक्षात कुपोषणाची आकडेवारी लपवली नाही तर तिची फोड करताना ३६ अधिक १४ ऐवजी २३ अधिक १४ लिहिले. बेरीज दोन्ही ठिकाणी पन्नासच आहे, असे डीएचओंचे म्हणणे आहे.

अतिरिक्त निधीबाबतची माहिती मिळणे बाकी
कुपोषणाच्या आकडेवारीतील तफावतीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी चूक मान्य केली असून, तो खुलासा संचालक कार्यालयाला सादर झाला आहे. त्याचवेळी कोरोना नियंत्रणासाठीच्या निधीतील अतिरिक्त निधी परत न केल्याबाबतची माहिती विशेष लेखा परीक्षणासह सादर करणे क्रमप्राप्त असून ती अद्याप प्राप्त व्हायची आहे.- डॉ. तरंगतुषार वारे, उपसंचालक, आरोग्य विभाग, अकोला.

सदर प्रकरणामुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. एनएचएम अंतर्गत हा खर्च केला गेला, हे खरे असले तरी डीएचओ कार्यालयाने पूर्व परवानगी न घेताच तो केला का, हे गुढ कायम आहे. त्याचवेळी मंजूर आराखडा कमी रकमेचा असताना शासनाने ८ कोटी जादा रक्कम का दिली, हेही न उलगडणारे कोडे आहे. दुसरीकडे संपूर्ण रक्कम खर्च झाल्यावरही आणखी काही देणी आहेत, असे सांगून त्यासाठी शासनाकडे आणखी रक्कम मागितली आहे, असे डीएचओंचे म्हणणे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमके दोषी कोण, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...