आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांचे हाल:डायलिसिस केंद्र अचलपुरात अन् उपचार अमरावती सुपर स्पेशालिटीत! ; केंद्र आठ दिवसांपासून बंद

परतवाडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना डायलिसिस सेवा मिळावी, या उद्देशाने मार्च २०२० मध्ये डायलिसिस केंद्र सुरू झाले. मात्र, सध्या येथील तंत्रज्ञ आजारी असल्याने आठ दिवसांपासून तो सुटीवर आहे. पर्यायी सुविधा नसल्याने डायलिसिस केंद्रदेखील बंद आहे. त्यामुळे नाइलाजास्तव रुग्णांना उपचारासाठी शहरातील खासगी केंद्रात अथवा अमरावती येथे जावे लागत आहे. त्यामुळे डायलिसिस केंद्र अचलपुरात अन् उपचार अमरावतीत, अशी व्यथा डायलिसिसच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांनी मांडली आहे. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस केंद्रात मेळघाटसह अंजनगाव सुर्जी, परतवाडा, अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यातील डायलिसिसचे रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, हे केंद्र या ना त्या कारणाने वारंवार बंद राहत असल्याने रुग्णांना त्याचा फायदा कमी अन् त्रासच अधिक होत आहे. परिणामी वेदनेने तडफडणाऱ्या रुग्णांना शहरातच असणाऱ्या एका खासगी केंद्रात जास्तीचे पैसे मोजून उपचार घ्यावे लागत आहेत अथवा थेट अमरावती गाठावे लागत आहे. यात पैसा आणि वेळेचाही अपव्यय होत आहे.

शहरात एक खासगी केंद्र केंद्रातील डायलिसिस तंत्रज्ञ आठ दिवसांपासून सुटीवर आहे. दरम्यान, कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने डायलिसिस सुविधा आठ दिवसांपासून बंद आहे. शहरात एक खासगी डायलिसिस केंद्र आहे. मात्र, त्याचे दर १५०० रुपये पर डायलिसिस असे असल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांना तेथील सुविधा परवडत नाही.

गैरसोय टाळण्यासाठी रुग्ण रेफर केले जातात ^अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील तांत्रिक कर्मचारी आजारी असल्यामुळे डायलिसिस केंद्र बंद आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना अमरावती येथे रेफर करण्यात येत आहे. -डॉ. सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक, अचलपूर

या ना त्या कारणाने नेहमी केंद्र बंद असते ^आधीच आर्थिक अडचणी. त्यात दुर्धर आजार. हातावर पोट असल्याने बाहेर खर्चिक उपचार परवडत नाहीत. उपचारासाठी येथे येतो. कधी तंत्रज्ञ नाही म्हणून, तर कधी मशीनमध्ये बिघाड झाल्याचे कारण देत केंद्र बंद ठेवले जात आहे. -पृथ्वीपाल कस्तुरे, रुग्ण, चिखली, ता. चिखलदरा

डायलिसिससाठी यावे लागते अमरावतीत पत्नीच्या दोन्ही किडनी कमकुवत झाल्या. त्यामुळे दोन वर्षांपासून आठवड्यातून एकदा न चुकता डायलिसिस करावेच लागते. मात्र अचलपुरातील केंद्र अनेकदा बंद राहते. अचलपूरचे केंद्र बंद असेल तर खासगी केंद्र किंवा अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जाऊन डायलिसिस केल्याशिवाय पर्याय नाही. खासगी रुग्णालयात आम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, त्यामुळे सुपर स्पेशालिटीमध्ये जावे लागते. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी राहते. कधीकधी तर अमरावतीत जावून रुग्णांच्या गर्दीमुळे डायलिसिस न करता परत यावे लागते. या वेळीसुद्धा आम्ही अमरावतीत डायलिसिस साठी गेलो होतो. अचलपूरचे डायलिसिस केंद्र सुरळीत सुरू राहणे अंत्यत आवश्यक आहे. -नामदेव हेकडे, रा. वडगाव (फत्तेपूर)

बातम्या आणखी आहेत...