आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तू नभातले तारे माळलेस का तेव्हा..? ; शब्द -सुरांच्या बरसातीत रसिक चिंब

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तू नभातले तारे माळलेस का तेव्हा.. माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?’....’फुलपाखरास ठावे कुठे बसायचे’... ‘मी किनारे सरकताना पाहिले’... अशा एकाहून एक सरस आशयघन गझलांनी अमरावतीकरांची शनिवारची रात्र बहरून गेली होती. प्रसंग होता, गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या ‘शब्द सुरांची भावयात्रा’ या गीत-संगीत मैफलीचा आणि ठिकाण होते अमरावतीचे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृह.

अमरावतीत तब्बल चार वर्षांच्या अंतराने पांचाळे यांची ही मैफल रंगली. महसूल अधिकारी, कर्मचारी परिवारातर्फे आयोजित या मैफलीला गझल, कविता, लेखन अशा विविधांगी साहित्यिक छटा असलेले विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जीवनाचे गहन तत्वज्ञान सांगणाऱ्या सुंदर शब्दात सजून आलेल्या गझला आणि तितकीच दमदार सुरेल गायकी अशी कधीही संपूच नये, अशी वाटणारी ही मैफल होती. या कार्यक्रमाने रसिकांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले.

या मैफलीसाठी संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. उत्तम शेर व गझलांना रसिकांनी ‘वाहवा’, टाळ्या व ‘वन्स मोअर’ची दाद देऊन रंगत वाढवली. कविवर्य सुरेश भट, गझलकार इलाही जमादार यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील तरुण गझलकारांपर्यंत अनेकविध गझला भीमराव पांचाळे यांनी यावेळी सादर केल्या. डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या ‘तू हसलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते, आणि ‘जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, या गझलांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली.तबल्यावर वर्ध्याचे देवेंद्र यादव, हार्मोनियमवर अकोटचे सुधाकर अंबुसकर, गिटारवर चंद्रपूरचे संदीप कपूर व बासरीवर अकोल्याचे प्रशांत अग्निहोत्री यांची समर्थ साथ लाभली. कवी किशोर बळी यांनी सुंदर सूत्रसंचालन केले. ध्वनी संयोजन नमूना स्थित रॉयल साऊंड सर्व्हिसेसची रफिकभाई यांनी केले. अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी प्रास्ताविक केले. तर प्रवीण येवतीकर यांनी स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन केले.

यवतमाळचे आरडीसी ललितकुमार वऱ्हाडे, अमरावतीचे आरडीसी आशिष बिजवल, अकोल्याचे आरडीसी संजय खडसे, तहसीलदार अनिल भटकर यांनी स्वागत केले. अतिरिक्त एसपी शशिकांत सातव, एसडीओ डॉ. नितीन व्यवहारे, इब्राहिम चौधरी, रणजित भोसले, नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, संतोष काकडे यांच्यासह गझलप्रेमी, रसिक उपस्थित होते. डॉ. पांढरपट्टे यांचे जुने ऋणानुबंध : श्रेष्ठ गझलकार, कवी स्व. सुरेश भट यांच्यासोबत पूर्वी अमरावतीला आलो होतो. त्यामुळे गझल व अमरावतीशी आपला जुना ऋणानुबंध आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...