आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुरस:थेट सरपंच निवडीमुळे राजकीय आखाड्यात लागणार पक्षांचा कस

अमरावती6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात १८ डिसेंबरला होऊ घातलेल्या २५७ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच निवडायचा असल्याने कधी नव्हे ते यावेळी पहिल्यांदाच या निवडणुकीत राजकीय पक्षांचा थेट हस्तक्षेप होत आहे. एरवी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा फारसा हस्तक्षेप नसतो. परंतु सरपंच थेट जनतेमधून निवडला जात असल्याने गाव पातळीवरच्या राजकीय हालचाली तीव्र झाल्या असून अता या आखाड्यात राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. सरपंचाला अख्खे गाव मतदान करणार असल्याने गावा-गावांतील प्रमुख व्यक्तींची निवड करून त्यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढण्याची तयारी बहुतेक राजकीय पक्षांनी चालवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींची मतदार संख्या घोषित केली आहे. सर्व २५७ ग्रामपंचायती मिळून ३ लाख ५१ हजार ३६८ मतदार आहेत. ही घोषणा झाल्यानंतर लगेच जिल्हा प्रशासनाने आपला मोर्चा मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्याकडे वळवला असून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदारसंघाबद्दलचे तपशिल दोन-तीन दिवसांत अंतीम केले जाणार आहेत. त्यासाठी निवडणूक यंत्रणा कामाला लागली असून योग्य त्या उपाय योजनांसह मतदान केंद्रांची संख्या घोषित केली जाणार आहे. जिल्हा मुख्यालयाचा तालुका असलेल्या अमरावतीसह, तिवसा, भातकुली, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, वरुड, मोर्शी, अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापुर, अंजनगाव सुर्जी, धारणी व चिखलदरा या चौदाही तालुक्यात ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

सर्वाधिक २६ ग्रामपंचायती आदिवासीबहुल मेळघाट क्षेत्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा तालुक्यातील आहेत. तर सर्वात कमी ७ ग्रामपंचायतींसाठी धामणगाव रेल्वे तालुक्यात मतदान घेतले जाईल. सदर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा २ नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. त्याच दिवसापासून या सर्व गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली. आठवडाभरानंतर २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवडणुकीद्वारे २५७ सरपंच व २ हजार ९९ सदस्यांची निवड केली जाणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी घोषित केल्यानुसार चिखलदरा तालुक्यातील २६, दर्यापूर तालुक्यातील २५, चांदूरबाजार व मोर्शी तालुक्यातील प्रत्येकी २४, धारणी, अचलपूर व वरुड तालुक्यातील प्रत्येकी २३, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी १७, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १३, तिवसा व अमरावती तालुक्यातील प्रत्येकी १२, भातकुलीतील ११ आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. निवडणूक घोषित झाल्याने त्याच क्षणापासून या गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

अशी आहे राजकीय पक्षांची व्यूहरचना
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व विचारांचे नागरिक सामूहिकरीत्या सहभागी होत असतात. ही निवडणूक थेट राजकीय पक्षाच्या नावावर किंवा चिन्हावरही लढली जात नाही. परंतु यावेळी बहुतेक राजकीय धुरीणांनी स्वत: नामानिराळे होत त्या-त्या गावांतील सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नेतृत्वात पॅनल गठित करण्याची तयारी सुरू केली आहे. सरपंच थेट निवडला जाणार असल्याने ग्रामस्थांमध्ये त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

शेजारी गावातही असेल आचारसंहिता
निवडणुकीची आचारसंहिता ही ज्या गावात निवडणूक आहे, तेथेच लागू आहे. परंतु जर निवडणूक असलेली ग्रामपंचायत ही एखाद्या नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या भौगोलिक सीमेला लागून असेल तर सदर ग्रामपंचायतींमधील मतदार प्रभावित होतील, असा निर्णय त्या स्थानिक स्वराज्य संस्थेलाही घेता येणार नाही. अर्थात त्या ठिकाणीसुद्धा निवडणुकीची आचारसंहिता लागू होते, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...