आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना निधीवरुन आरोग्य संचालकाचा डीएचओंवर ठपका:अतिरिक्त 8 कोटी रुपये परत केलेच नाही; प्रशासकीय कारवाईची नोटीस

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात प्राप्त झालेला ८ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने परत न केल्यामुळे आरोग्य संचालकांनी डीएचओंना जाब विचारला असून त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाईचा इशारा दिला आहे. दुसरीकडे या पत्रामुळे अख्खे जिल्हा प्रशासन ढवळून निघाले असून वेगवेगळ्या कार्यालयांमधील अंतर्गत पत्रव्यवहाराला वेग आला आहे.

कोरोना काळात करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी जिल्ह्याचा ३६ कोटी ६७ लाख ५९ हजार रुपयांचा आराखडा राज्य शासनाने मंजूर केला होता. प्रत्यक्षात मात्र या जिल्ह्याला ४४ कोटी ७५ लाख ६१ हजार रुपये देण्यात आले. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत ८ कोटी ८ लाख २ हजार रुपये शासकीय तिजोरीत परत करणे आवश्यक होते. परंतु सदर कार्यालयाने तसे न करता ती रक्कम कोरोना काळातील अतिरिक्त उपाययोजनांवर खर्च केली. मुळात ही रक्कम त्वरेने परत करावी, अशी ताकीद वारंवार राज्य शासनातर्फे त्यांना देण्यात आली.

आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त तथा एनएचएमचे संचालक डॉ. रामास्वामी एन. यांनी व्हीसीद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधूनही त्यांना ही रक्कम परत करण्यास सांगितले होते. परंतु तरीही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्या कार्यालयामार्फत कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, असे आयुक्तांच्या पत्रात म्हटले आहे.

आरोग्य आयुक्त असतानाच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे (एनएचएम) संचालक असलेल्या डॉ. रामास्वामी एन. यांच्या पत्रानुसार डीएचओ कार्यालयाने अद्याप ८ कोटी ८ लाख २ हजार रुपये जमा केले नाहीत. त्यामुळे ही रक्कम जमा का केली नाही आणि विलंब का झाला हे दोन्ही मुद्दे सकारण विचारण्यात आले असून सदर बाबतीत आपला खुलासा असमाधानकारक आढळून आल्यास आपणाविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे म्हटले आहे.

विशेष असे की कोरोना काळात झालेला संपूर्ण खर्च अर्थात तात्पुरत्या स्वरुपातील वैद्यकीय व वैद्यकीय यंत्रणेला पुरक अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती, औषधांची खरेदी, कोरोनाबाबतची जनजागृती, मास्क व सॅनिटायझरची खरेदी आदी बाबी एनएचएममार्फत राबविण्यात आल्या. त्यामुळे हा संपूर्ण खर्च एनएचएमनेच (अ‌भियान) केला आहे. परंतु तो विभागही डीएचओ यांच्याच देखरेखीत कार्यरत असल्याने या अनियमिततेसाठी तेच जबाबदार आहेत.

एक खुलासा मागवला, दुसरा अप्राप्त

कुपोषणाच्या आकडेवारीतील तफावतीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी चूक मान्य केली असून तो खुलासा संचालक कार्यालयाला सादर झाला आहे. त्याचवेळी कोरोना नियंत्रणासाठीच्या निधीतील अतिरिक्त निधी परत न केल्याबाबतची माहिती विशेष लेखा परीक्षणासह सादर करणे क्रमप्राप्त असून ती अद्याप प्राप्त व्हायची आहे. -डॉ. तरंगतुषार वारे,उपसंचालक, आरोग्य विभाग, अकोला

बातम्या आणखी आहेत...