आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग विद्यार्थ्यांना वाढीव गुण नाकारले:सर्वसाधारण विद्यार्थ्यांसारखाच अतिरिक्त ग्रेस द्यावा; एआयएसएफचे कुलगुरूंना पत्र

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुलगुरुंना निवेदन देण्यासाठी विद्यापीठात पोचलेले एआयएसएफचे विभागीय पदाधिकारी प्रा. कैलास चव्हाण. - Divya Marathi
कुलगुरुंना निवेदन देण्यासाठी विद्यापीठात पोचलेले एआयएसएफचे विभागीय पदाधिकारी प्रा. कैलास चव्हाण.

दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसाधारण विद्यार्थ्यांसारखेच अतिरिक्त ग्रेस गुण देण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने (एआयएसएफ) केली आहे. फेडरेशनचे अमरावती विभागीय संघटक प्राध्यापक कैलास चव्हाण, जिल्हाध्यक्ष धीरज बनकर व जिल्हा सचिव योगेश चव्हाण आदींच्या नेतृत्वात विद्यापीठ प्रशासनाला एक निवेदन देण्यात आले. याद्वारे ही मागणी रेटण्यात आली आहे.

कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने अलिकडेच एक निर्णय घेत मार्च २०२२ च्या सर्व परीक्षार्थ्यांना अधिकचे ग्रेस गुण दिले आहेत. परंतु असे करताना दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली अधिकची सवलत दिली नाही. त्यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसारखेच अतिरिक्त ग्रेस गुण त्यांनाही देण्यात यावे, असे एआयएसएफचे म्हणणे आहे. मुळात सामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत दिव्यांग विद्यार्थ्यांना अधिक परीश्रम घेऊन परीक्षा द्यावी लागते. परंतु अतिरिक्त ग्रेस गुण देताना मात्र ही भूमिका घेण्यात आली नाही.

विद्यापीठाच्या प्रचलित नियमानुसार सर्वसाधारण परिस्थितीत सामान्य विद्यार्थ्यांना एक टक्का तर दिव्यांग विद्यार्थ्यांना ३ टक्के ग्रेस गुण दिले जातात. अर्थात संबंधित विद्यार्थ्याला एकत्रित गुण किती मिळाले आहेत, त्यानुसार त्या-त्या संवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एक टक्के आणि तीन टक्के गुण मोजले जाऊन संबंधितांच्या एकूण गुणांमध्ये ते जोडले जातात. परंतु मार्च २०२२ च्या परीक्षेला कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे विद्यापीठाने अलिकडेच एक निर्णय घेत सामान्य विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण एक टक्क्यांवरुन तीन टक्क्यांपर्यंत वाढविले आहेत. मात्र ही वाढ करताना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये कोणतीही वाढ प्रस्तावित केली नाही. त्यांचे आधीचे तीन टक्के ग्रेस गुण तसेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण जर तिप्पट केले, तर दिव्यांग विद्यार्थ्यांचेही तिप्पट करुन त्यांना ९ टक्के ग्रेस गुण दिले जावे, असे एआयएसएफचे म्हणणे आहे.

दरम्यान एआयएसएफच्या या मागणीनंतर विद्यापीठ आता काय निर्णय घेते, याकडे सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. अमरावती विद्यापीठ क्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांनी एआयएसएफच्या त्या-त्या जिल्हा शाखांकडे आपली कैफीयत नोंदविली. त्यानुसार संघटनेच्या प्रतिनिधीमंडळाने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन सादर करुन या मागणीकडे कुलगुरु, प्र-कुलगुरु व विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींचे लक्ष वेधले आहे.

—----------------------------------

बातम्या आणखी आहेत...