आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावध व्हा:मान्सूनबरोबरच आपत्तींचीही चाहूल; वेळीच उपाययोजनांची गरज

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सूनच्या आगमनाला काही दिवस शिल्लक असतानाच जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाचे तांडव सुरू झाले आहे. ही मान्सूनबरोबरच आपत्तीचीही चाहूल होय. पूर, वीज कोसळणे, गारपिटीत अनेकांना दुखापत होते, तर काही वेळा मृत्यू ओढवणे अशा घटना घडतात. यापासून सुरक्षित राहण्यासाठी खबरदारीही तेवढीच आवश्यक असून आपत्ती निवारण यंत्रणेसोबतच सर्वसामान्यांनाही स्वत:च्या सुरक्षेसाठी पूर्ण प्रयत्न करावे लागतील. बुधवारी दर्यापुरात गारपिटीसह वादळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे वैभव मंगल कार्यालयातील दोन सभागृहांवरील टिनाचे छप्पर उडाले. या घटनेत ४० जण जखमी झाले. त्यापैकी ४ जण गंभीर आहेत. दर्यापुरात अशी घटना प्रथमच घडली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘खबरदारी संकटातून तारी’ या म्हणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ही मान्सूनपूर्व आपत्तीची नांदी असल्याने जिल्हावासीयांना आगामी पावसाळ्यात आणखी सतर्क राहावे लागणार आहे. शहरातच आपत्ती निवारणाची मर्यादित साधने आहेत, तेथे ग्रामीण भागाचा तर विचारच करायला नको. अतिवृष्टीत शहर जलमय होते. लाखो रुपयांचा माल वाया जातो. पिकांची नासाडी होते. असे प्रकार टाळण्यासाठी इतरांआधी प्रत्येकाने स्वत: सज्ज असावेत, असे आवाहन मनपा व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दर्यापुरातील पहिलीच घटना
दर्यापुरात गारपीटीसह मान्सूनपूर्व पावसामुळे मोठी दुर्घटना घडण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी तालुक्याने पुराचे तांडव अनुभवले असून, १० व ११ जुलै २०२० मध्ये लेंडी नाल्याचे खोलीकरण न झाल्याने अतिवृष्टीमुळे पुराची भिंत फुटून थिलोरी गावात पाणी शिरले होते. त्यात १७५ घरांची पडझड व नुकसान झाले होते. २०२१ मध्ये जैनपूर येथे दोन शेतमजूर वीज कोसळून जखमी झाले होते. एवढेच नव्हे, तर विजेच्या तीव्र प्रवाहामुळे अनेकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निकामी झाल्या होत्या. दर्यापुरातील व्यापारी संकुलात पाणी शिरल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. पेठ इतबारपूर गावाचा शहराशी संपर्क तुटला होता. चंद्रभागा नदीला मिळणारे बोर्डी, वाघाडी, निनार नाल्यांचे शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले होते.

वादळी वाऱ्यामुळे अपघातांचा धोका
वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून, विद्युत तारा तुटून व घरावर पडून अपघाताचा धोका असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत घराबाहेर न पडणे तसेच बाहेर पडल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे आवश्यक आहे. वाहनचालकांनी झाडाखाली थांबू नये कारण ते कधी कोसळेल याचा नेम नसतो. शक्यतो टिनाचे पत्रे असलेल्या छताखाली उभे राहण्याची टाळावे.

वीज पडल्यामुळे जीव जाण्याची भीती
पावसाळ्यात ढगांच्या गडगडाटासह विजेचेही तांडव सुरू होते. यात गेल्या वर्षी जिल्ह्यात ७ जणांनी जीव गमावला. अशा घटना टाळायच्या असतील तर मोकळे मैदान, शेत, झाडाच्या खाली, गोठ्यात आश्रय घेऊ नये. तर सिमेंट काँक्रीटचे घर किंवा छत, मंदिर अशा सुरक्षित ठिकाणी शक्य तेवढ्या लवकर पोहोचावे. उगाच जिवाशी खेळ करू नये.

घरे कोसळणे, पुरात वाहण्याचा धोका
अतिवृष्टीत कच्ची व शिकस्त झालेली घरे कोसळण्याचा सर्वाधिक धोका असतो. अशा घरांमधून सुरक्षित घरात स्थानांतरित व्हावे. तसेच नदी, नाल्याला पूर येऊन त्यात वाहून जाण्याच्याही भीती असते. त्यामुळे अति साहस न करता नदी, नाल्यांजवळ घर असलेल्यांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, पाणी वाहत असलेल्या पुलावरून वाहने नेऊ नयेत.

वादळी पावसात अति धाडस धोकादायक
मान्सूनपूर्व वादळी पावसात गारपीट, वीज कोसळणे, झाडे कोसळणे, कच्च्या घरांची पडझड अशा घटना घडत असतात. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे अत्यावश्यक आहे. कोणीही झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच वाहन चालकांनी धाडस न करता रस्त्यावर सुरक्षित आश्रय शोधून तेथे थांबावे. गारपीट जोवर थांबत नाही, तोवर घराबाहेर पडू नये. कोणतीही घटना घडल्यास आपत्ती निवारण कक्षासह जबाबदार अधिकाऱ्यांना सूचना द्यावी.

बातम्या आणखी आहेत...