आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण, एसटीच्या 109 कर्मचाऱ्यांना मिळाले नियुक्तीपत्रे:संजय राठोड्यांच्या हस्ते वाटप; विद्युत सहायक, सहायक तंत्रज्ञ, चालक - वाहकांची भरती

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने नोकरीची धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत आज, गुरुवारी येथे वीज कंपनीच्या 96 आणि एसटी महामंडळाच्या 13 अशा 109 उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली.

येत्या काळात इतरही विभागातील भरतीचा अनुशेष दूर केला जाणार असून अनेक बेरोजगारांना रोजगार प्रदान केला जाईल, असे आश्वासक विधान अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या महासंकल्प - महारोजगार मोहिमेचा अमरावती विभागीय कार्यक्रम आज दुपारी येथील नियोजन भवनात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

मंचावर विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपायुक्त संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, प्रादेशिक वनसंरक्षक जी. के. अनारसे, महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, पारेषणचे मुख्य अभियंता जयंत विखे, महावितरणच्या अकोला परिक्षेत्राचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, सहायक महाव्यवस्थापक सूर्यकांत फलटणकर, मनीष भोपळे, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान महावितरणमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 95 विद्युत सहायक, महापारेषणमध्ये नियुक्त एक सहायक तंत्रज्ञ व परिवहन महामंडळात नियुक्त 13 चालक-वाहक अशा एकूण 109 उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे मान्यवरांच्या वाटप करण्यात आले.

काही नियुक्ती आदेश मंत्री महोदयांच्या हस्ते तर काही नियुक्ती आदेश महावितरण व एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. मंत्री राठोड पुढे म्हणाले की, कोरोनाकाळात उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने भरती प्रक्रियेवरील निर्बंध शिथिल केले आहेत. रिक्त पदांमुळे यंत्रणेवर ताण येतो. क्षेत्रीय स्तरावर काम करणारे कर्मचारी नसतील तर एकालाच अनेक प्रभार सांभाळावे लागतात. त्यामुळे कामे प्रलंबित राहतात.

परिणामी सर्व विभागांत भरती प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, या उपक्रमाव्दारे तरुणांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. शुभारंभाच्या दिवशी वेगवेगळ्या खात्यात राज्यात 2 हजार युवकांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जात आहे.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील मुंबई येथील कार्यक्रमाच्या थेट प्रसारणसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छापर संदेशाची चित्रफीतही दाखविण्यात आली. संचालन विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार वैशाली पाथरे यांनी केले. तर आभार उपायुक्त संजय पवार यांनी मानले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता दीपक देवहाते, महावितरणचे कार्यकारी अभियंता खानंदे,प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नियुक्ती आदेश मिळालेले उमेदवार तथा त्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...