आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तिवस्यात 20 महिलांना शिलाई मशिन वाटप; एकल महिलांना आर्थिक उन्नतीसाठी मिळाला शिलाई मशिनचा आधार

तिवसा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २० एकल महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी गुरूकुंज मोझरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व अपेक्षा होमिओ सोसायटी यांनी संयुक्तपणे पुढाकार घेत त्यांना शिलाई मशीन प्रदान करीत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एसबीआय लेडीज क्लब, महाराष्ट्र सर्कलच्या प्रेसिडेंट नम्रता सिंग व स्टेट बँकेच्या अधिकारी मंजुषा जोशी यांच्या हस्ते संस्थेचे डॉ. मधुकर गुंबळे व डॉ एकनाथ मोहोड यांच्या उपस्थितीत २० एकल महिलांना १ एप्रिल रोजी गुरुकुंज मोझरी येथील किलबिल सेंटर येथे या शिलाई मशीन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्या. या वेळी स्टेट बँकेतील मॅनेजर वृषाली बोजे, शीतल मालवे, समीक्षा धोटे, पंकज समर्थ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेच्या व्यवस्थापक वृषाली बोके यांनी केले. तिवसा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी एसबीआय व अपेक्षा होमिओ सोसायटीद्वारे हे कौतुकास्पद व सामाजिक भान जपणारे पाऊल उचलण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. त्या अंतर्गत एकूण २० एकल महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.

शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. मात्र निसर्गाचा लहरीपणा व प्रसंगी शासनाचे उदासीन धोरण यामुळे खचून जावून हा पोशिंदा आत्महत्या करीत आहे, परंतु त्याच्या आत्महत्येनंतर मात्र प्रश्न सुटण्याऐवजी अजूनच बिकट होतात. घरातील महिलेवर अचानक सर्व जबाबदारी येवून पडते. कुटुंबप्रमुखाच्या निधनातून सावरत नाही, तोच प्रपंच व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तिच्यापुढे आ वासून उभा असतो. अशा वेळी काय करावे, या विवंचनेत ती असते. मात्र अशाच तालुक्यातील २० एकल महिलांच्या मदतीला बँक व अपेक्षा होमिओ सोसायटी धावून आली असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमात शिलाई मशीन देण्यात आल्याने एकल महिलांचा स्वयंरोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...