आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हास्तरीय टी-20 क्रिकेट स्पर्धा; चंद्रपूर संघाचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव, सलग दुसऱ्या सामन्यात अमरावतीचा विजयी डंका

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ क्रिकेट संघटनेद्वारे तसेच जिल्हा हौशी क्रिकेट संघटना, अमरावतीच्या यजमानपदाखाली एचव्हीपीएम क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय टी-२० क्रिकेट स्पर्धेत अमरावतीने सोमवार ४ रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात चंद्रपूरचा ८ गड्यांनी दणदणीत पराभव करून सलग दुसऱ्या सामन्यात विजयी डंका मिरविला. एचव्हीपीएम क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या चंद्रपूरच्या गोलंदाजांना अमरावतीच्या धारदार माऱ्यापुढे सूर गवसला नाही. चंद्रपूरने १६.१ षटकांत सर्व बाद ९४ धावांपर्यंत मजल मारली. सलामी जोडीतील दिग्विजय देशमुखने २८ तर भारत नायडू १८ यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. परंतु, अमरावतीच्या गोलंदाजांनी तिखट मारा करून चंद्रपूरच्या फटकेबाजांना स्वैर फलंदाजी करू दिली नाही. विवेक दलवानी, अंकुश नवलकर यांनी प्रत्येकी तीन तर पराग गांधी, अविनाश जाधव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या अमरावती संघाने १५.३ षटकांत २ फलंदाज गमावून ९८ धावा करीत विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर वेदांत जाजूने ७ चौकार, एका उत्तुंग षटकारासह ४८ धावा केल्या. पीयूष खोपेने ३ चौकारांसह नाबाद ३० तर अपूर्व वानखडेने दोन चौकारांसह नाबाद २ धावांची खेळी केली. चंद्रपूरच्या नदीम शेख व मेहूल शेगावकर यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

बुलडाण्याची वाशीमवर १९ धावांनी मात
सकाळच्या पहिल्या सत्रातील सामन्यात बुलडाणा संघाने वाशीमचा १९ धावांनी पराभव केला. बुलडाण्याचा सामनावीर सलामी फलंदाज सौरभ ठुब्रिकरने ७ चौकार व एका षटकारासह ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. कर्णधार आवेश शेखने २९ व बालकृष्ण चायंतने २५ धावा तडकावल्या. त्यामुळे बुलडाण्याने २० षटकांत ६ फलंदाज गमावून १४४ धावा केल्या.वाशीमकडून राहुल यादवने भेदक गोलंदाजी करताना ४ बळी घेतले. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या वाशीम संघाचे फलंदाज नियमित अंतराने बाद झाल्यामुळे त्यांना १९ धावांनी पराभव सहन करावा लागला. वाशीमला १८.३ षटकांत सर्व बाद १२५ धावा उभारता आल्या. वाशीमकडून शंतनू चिखलेेेने सर्वाधिक ३२ धावा तडकावल्या. यात एक चौकार व तीन उत्तुंग षटकारांचा समावेश होता. राहुल चचाणेनेही ३२ धावांचे योगदान दिले. बुलडाण्याकडून सामनावीर दीपक जांगिडने ४ षटकांत केवळ ११ धावा देत ६ फलंदाजांना तंबूत धाडले. सुनिकेत बिंगेवार व संकर्ण वाकळे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...