आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:जिल्हा स्त्री रुग्णालय ‘डफरीन’ची ‘प्रहार’ने करून घेतली प्रशासनाकडून साफसफाई; आठ दिवसांचा अल्टिमेटम

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा स्त्री रुग्णालयाचा (डफरीन) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचा आरोप प्रहार-जनशक्ती पक्षाने केला आहे. गत काही दिवसांपासून स्वच्छता कर्मचारी नसल्याने रुग्णालयाची साफ सफाई बरोबर होत नसल्याने परिसरात, वॉर्डात दुर्गंधी, अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे या विरोधात प्रहारच्या वतीने बुधवारी डफरीन रुग्णालयात धडक देत तीव्र आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अरुण साळुंखे यांचे दालन गाठून त्याच्या हातात झाडू दिला.

सोबतच साळुंखे यांच्या हाताने रुग्णालय परिसराची स्वच्छता करवून घेतली. तसेच आठ दिवसात स्वच्छतेच्या प्रश्नावर दखल न घेतल्यास ‘प्रहार स्टाइल’ने रुग्णालय प्रशासनाला संपूर्ण परिसराची सरसकट साफसफाई करण्यास भाग पाडू, असा इशारा यावेळी ‘प्रहार’च्या वतीने देण्यात आला.‘प्रहार-जनशक्ती’ पक्षाच्या म्हणण्यानुसार जिल्हा स्त्री रुग्णालय ( डफरीन) येथील परिसरात, वाॅर्डात अतिशय घाणीचे साम्राज्य पसरलेले आहेत.

वॉर्ड, परिसरातील साचलेल्या घाणीमुळे महिला रुग्णांना, व सोबत येणाऱ्या नातेवाइकांवर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य प्रशासनाकडे पुरेसे स्वच्छता कर्मचारी नसल्यामुळे साफसफाईचा प्रश्न निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, दररोज होणारी रुग्णालयातील साफसफाई कामे थांबलेली आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात घाण साचलेली आहे. येथे येणाऱ्या, सोबतच रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्ण, शिशु, यांचा आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासन झोपी गेल्याचा आरोप यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. डफरीनच्या भोंगळ कारभारा विरोधात बुधवारी प्रहारच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त प्रहार पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांच्या हाती झाडू देऊन रोष व्यक्त केला. तसेच अधीक्षकांना सोबत घेऊन रुग्णालय परिसराची स्वच्छता करवून घेतली. यावेळी स्वच्छतेच्या गंभीर प्रश्न संदर्भात अवगत करून दिले. त्यासोबतच आठ दिवसांत यावर तत्काळ मार्ग काढावा. अन्यथा डफरीन प्रशासनाने तयार राहावे, असा इशारा यावेळी प्रहार- जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी महानगरप्रमुख बंटी रामटेके, शहर संपर्क प्रमुख गोलू पाटील, शहर उपप्रमुख श्याम इंगळे, जिल्हा महासचिव शेख अकबर, शहर संघटक मंगेश कविटकर, शहर महासचिव अभिजित गोंडाणे, युवक आघाडी श्याम कथे, पंकज सुरडकर, ऋषभ मोहोड, विक्रम जाधव, रावसाहेब गोंडाणे, अजय तायडे, नंदू वानखडे, कुणाल खंडारे, सुधीर पाटील, सौरभ रत्नपारखी, सागर मोहोड, सुरेंद्र गवई, तन्मय पाचघरे, अनिता सोमकुवर, आदी उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयातील अस्वच्छतेकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्याने रुग्णालयातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आठ दिवसांचा इशारा
सध्या पावसाचे दिवस आहेत. रुग्णालय परिसरात घाण पसरलेली आहे. यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांना व सोबत येणाऱ्या नातेवाइकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. आठ दिवसांत यावर तोडगा काढावा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष प्रशासनाला परिसराची स्वच्छता करायला लावेल.
बंटी रामटेके, महानगरप्रमुख, प्रहार

प्रश्न लवकरच मार्गी लावणार
सध्या १०० सफाई कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. साफसफाईचा प्रश्न आहे. मात्र, तो लवकरच मार्गी लागणार आहे. वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली आहे.
अरुण साळुंके, प्रभारी,वैद्यकीय अधीक्षक, डफरीन

बातम्या आणखी आहेत...