आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​मनुष्यबळाची कमी:जिल्हा स्त्री रुग्णालय ‘डफरीन’चे आरोग्य ऑक्सिजनवर; रुग्णांचे हाल

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा स्त्री रुग्णालय ‘डफरीन’चेही आरोग्य हे इर्विन रुग्णालयांप्रमाणे ऑक्सिजनवर आहे. या रुग्णालयातही मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा अभाव आहे. येथे वैद्यकीय अधिकारी पदाचे एकूण पाच पदे मंजूर असताना फक्त एकच पद भरले असून, चार पदे रिक्त आहेत. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ तसेच स्त्रीरोग (प्रसूती) तज्ज्ञाचे पदही रिक्त आहे. त्यामुळे येथे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना योग्य उपचार कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने वरिष्ठांकडे रिक्त पदे भरण्यात यावी, असा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे वैद्यकीय अधीक्षक विद्या वाठोडकर यांनी सांगितले.

डफरीन रुग्णालयात रोज जिल्हाभरातील गर्भवती महिला या प्रसूतीसाठी दाखल होत असतात. जिल्ह्यातील हे एकमेव रेफर सेंटरही आहे. मात्र, येथे या महिलांना योग्य उपचार मिळत नसल्याची ओरडही महिलांच्या नातेवाइकांकडून वारंवार ऐकायला मिळत आहे. रुग्णालयातील मनुष्यबळ कमी असल्याने येथील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. महिन्याभरापूर्वी रुग्णालयात सिझेरियन झालेल्या एका महिलेच्या पोटामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कापडी नॅपकीन राहिल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाइकांनी केला होता. या घटनेमुळे रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड झाला असल्याचे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. ‘वर्ग ४’ मधील मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णालय परिसरात असलेल्या घाणीमुळेही एका राजकीय संघटनेने अधिकारी व कर्मचारी आंदोलन केले होते. एकीकडे लोकसंख्येच्या तुलनेत सोयीसुविधा तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्षात मंजूर पदेही पूर्णपणे भरलेली नसल्याची माहिती डफरीन रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर
रुग्णालयातील उपलब्ध बेडपेक्षा दाखल रुग्णांची संख्या जास्त आहे. रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव असून, वर्गवारीनुसार आवश्यक नियुक्ती संदर्भातील प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.
विद्या वाठोडकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक. डफरीन रुग्णालय, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...