आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:आकाशात आजपासून तीन दिवस उल्कावर्षावाची दिवाळी, रात्री बारानंतर पहाटेपर्यंत दिसणार विलोभनीय दृश्य

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • असा पाहता येईल उल्कावर्षाव

दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. पृथ्वीवर एक दिवाळी साजरी होत असतानाच मंगळवारपासून (दि. १७) पुढील तीन दिवस आकाशात सिंह तारकासमुहातून उल्कावर्षावाच्या रुपाने दुसरी दिवाळी साजरी होत आहे. हा उल्कावर्षाव रात्री १२ वाजेनंतर पहाटे दिवस उजाडेपर्यंत पाहायला मिळणार असल्याची अनोखी संधी नागरिकांसह विद्यार्थ्यांना मिळणार असून हा उल्कावर्षाव कोणत्याही साधनांशिवाय उघड्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याने प्रत्येकाने त्याची अनुभूती घ्यावी, असे आवाहन येथील मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने व विजय गिरूळकर यांनी केले आहे.

मंगळवारी रात्री पूर्व आकाशात सिंह राशीतून हा उल्कावर्षाव पाहायला मिळेल. खरंतर हा उल्कावर्षाव दरवर्षी १४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत पहायला मिळतो. त्यात १७ नोव्हेंबरला तो उच्चतम असतो. हा उल्कावर्षाव होण्यासाठी टेंपल टटल हा धूमकेतू कारणीभूत आहे. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्यमालेची एक फेरी पूर्ण करतो. त्याने सोडलेल्या कचऱ्याजवळून पृथ्वी दरवर्षी नोव्हेंबरच्या काळात जात असल्याने घर्षणामुळे हा उल्कावर्षाव पहायला मिळतो. १७ नोव्हेंबरला ताशी सुमारे ४० उल्का पहायला मिळतात. या उल्कांचा वेग सेकंदाला ७१ किमी. इतका असतो.३३ वर्षांनी या राशीत प्रचंड उल्कावर्षाव होतो. या वेळी ताशी १० हजार इतक्या उल्का दिसतात. या पूर्वी १९६६ साली असा उल्कावर्षाव पाहायला मिळाला होता. त्याला लीयोनिड्स असे म्हणतात.

या वर्षी उल्कावर्षावाचे प्रमाण कमी : या वर्षी उल्कावर्षावाचे प्रमाण कमी असणार आहे. कारण नोव्हेंबर महिन्यात टेंपल टटल धूमकेतू सूर्याभोवती गवसणी घालून निघून गेला. त्या जोडी कणांच्या पट्ट्यामधून जर पृथ्वी गेली तसेच त्या वेळेस रात्र असेल, तरच उल्कावर्षाव उत्तम दिसू शकतो, परंतु जर पृथ्वी या पट्ट्याच्या वरून अथवा खालून निघाल्यास हा उल्कावर्षाव अत्यल्प दिसतो. याशिवाय त्याच्या उच्चतम पातळीच्या वेळी दिवस असेल, तर रात्रीच्या सुमारास उल्कावर्षाव कमी प्रमाणात दिसेल. या वर्षीदेखील पृथ्वी या पट्ट्यातून जाण्याची शक्यता तेवढी नसल्यामुळे उल्कावर्षाव कमी प्रमाणातच पाहायला मिळेल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरकर तसेच वेस्टवर्ल्डचे प्रा. प्रवीण विधळे यांनी दिली. साध्या डोळ्यांनी पाहता येणारा हा उल्कावर्षाव सर्वांसाठी एक संधी आहे. तासाभरात किती उल्का झाल्यात याची नाेंद हौशींसह विद्यार्थी ठेवू शकतात. ही नाेंद संस्थेकडे पाठवू शकतात.

असा पाहता येईल उल्कावर्षाव
उल्कावर्षाव पाण्यासाठी अंधारी टेकडी किंवा डोंगरावरून पाहता येईल, घराच्या गच्चीवरून वा मोकळ्या जागेतूनही बघता येईल, सपाट पठारावर चटई वा अंथरूण घालून त्यावर झोपून संपूर्ण आकाशात होणारा उल्कावर्षाव पाहता येईल.

या नंतरचा होणारा उल्कावर्षाव
पुढील उल्का वर्षाव हा २०३४-३५ या कालावधीत दिसणार असून त्या वेळी उल्कावर्षावाचे प्रमाण जास्त राहील. आकाशगंगेतील खगोलीय उल्कापिंडांच्या प्रकारानुसार या उल्कावर्षावांचे रंग वेगवेगळे असू शकतात.

बातम्या आणखी आहेत...