आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांचा इशारा:शेतमाल खरेदी प्रक्रिया शेडमध्ये करा; अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आलेल्या शेतमालाचे शनिवारी (दि. १८) पावसाने नुकसान झाले. त्याचे तत्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसेच पावसाळी वातावरण लक्षात घेता खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न घेता शेडमध्येच करावी, असे न केल्यास संबधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी रविवारी (दि. १९) बाजार समिती प्रशासनाला दिला. शनिवारी सुमारे २ ते अडीच हजार पोते पावसात भिजले असून, २५ पोते अक्षरश: पावसात वाहून गेल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने रविवारी (दि. १९) प्रकाशित केले होते.

शहरात शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास झालेल्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी बांधवांकडून आवक झालेल्या शेतीमालाची प्रचंड हानी झाली. याची तत्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकरी बांधवांचे नुकसान झाल्यास कुणाचीही गय करणार नाही. संपूर्ण मालाचे सविस्तर पंचनामे करावेत. ही प्रक्रिया गतीने राबवावी. प्रत्येक शेतकरी बांधवाला न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री अॅड. ठाकूर यांनी दिले.

जिल्हा उपनिबंधक तथा बाजार समिती प्रशासक राजेश लव्हेकर यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ नये, यासाठी आवक मालाची संपूर्ण खरेदी करण्यासाठी व्यापारी,अडते यांना बाजार समितीमार्फत सूचना देण्यात आली व बहुतांश खरेदी पूर्ण होईल, असा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार बहुतांश खरेदी पूर्ण झाली. यापुढे मालाची खरेदी प्रक्रिया शेडमध्ये राबवण्याबाबत स्पष्ट सूचना दिली आहे. संबंधितांना समितीमार्फत नोटिसाही जारी केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...