आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेशी संबंधित डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँकेच्या १७ सदस्यीय संचालक मंडळासाठी रविवारी पार पडलेल्या मतदानात ३५.०१ टक्के मतदारांनी सहभाग नोंदवला. सोमवार, २ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता पंचवटी चौक स्थित श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात मतमोजणी सुरू होणार असून टप्प्याटप्प्याने निकाल घोषित केला जाणार आहे.
जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांसह अकोला, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यात व्याप असलेल्या या बँकेचे एकूण सभासद ३२ हजार ६४६ आहेत. त्यापैकी केवळ ११ हजार ४३० मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला. निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहाेचलेल्या आकडेवारीनुसार शहरीपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला. त्यामुळेच शहरी भागात झालेले मतदान ५ हजार २६२ वर थांबले असून ग्रामीण भागातील ६ हजार १६३ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत प्रस्थापितांचे प्रगती पॅनल विरुद्ध इतरांचे शिवाजी पॅनल असा सामना रंगला होता. ज्यांच्या हस्तक्षेपामुळे बँक सुरुवातीच्या काही वर्षात तोट्यात येऊन काही गैरव्यवहार झाले होते, त्यांनीच पुन्हा डोके वर केल्यामुळे त्यांच्याविरोधात शिवाजी पॅनलने आघाडी उघडली होती. दरम्यान कमी झालेल्या मतदानाचा फटका कुणाला बसतो आणि लाभ कुणाला होतो, हे मतमोजणीअंतीच कळेल.
सदर बँकेचे संचालक मंडळ १७ सदस्यीय आहे. २५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील ८ संचालक, २५ किमी अंतराच्या आतील ४ संचालक, महिला संवर्गातील दोन आणि एससी-एसटी, व्हीजे-एनटी आणि ओबीसी संवर्गातून प्रत्येकी एक संचालक अशी त्यांची विभागणी आहे. यासाठी ३० उमेदवार मैदानात असून त्यापैकी नेमके कोण बाजी मारते, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. ही निवडणूक अविरोध व्हावी म्हणून प्रगती पॅनलने बराच प्रयत्न केला होता. परंतु अखेरपर्यंत त्यांना यश आले नाही. ३० उमेदवारांमध्ये प्रगती पॅनलचे १७, शिवाजी पॅनलचे १२ आणि इतर एक अशी उमेदवारांची विभागणी आहे.
एक जागा बिनविरोध
प्रगती पॅनलचे अक्षय इंगोले हे ओबीसी संवर्गातून बिनविरोध विजयी झाले असून, उर्वरित १६ जागांसाठी रविवारी मतदान झाले. मुळात शिवाजी पॅनलच्या एकूण उमेदवारांची संख्याच १२ असल्याने उर्वरित पाच जागा आजच प्रगती पॅनलने जिंकल्या आहेत. त्यापैकी ओबीसी संवर्गाचा निकालही लागला. परंतु इतर संवर्गातील उमेदवारांची निवड ही पसंतीक्रमाने होत असल्यामुळे ते चार जण नेमके कोण, हे साेमवारी निकालाअंतीच कळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.