आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत निवडणुकांमुळे थांबविण्यात आलेली येथील डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नववर्षाच्या पहिल्या दिवशी (1 जानेवारी) होणार आहे. तत्पूर्वी बुधवार, 21 डिसेेंबर रोजी या निवडणुकीतील उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाईल.
राज्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरु आहेत, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे आणि आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करुन घेणे शक्य नाही, या सबबीवर शासनाने सहकार क्षेत्रातील अ व ब वर्गात मोडणाऱ्या विविध संस्थांच्या निवडणुका थांबविल्या होत्या. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 29 नोव्हेंबरला तसे आदेश धडकले होते. सदर निवडणूक ज्या टप्प्यावर पोहोचली आहे.
ती त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात यावी, असे त्या आदेशाचे म्हणणे होते. त्यामुळे उमेदवारांची यादी घोषित करण्यापासूनची पुढची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता हीच प्रक्रिया आगामी 21 डिसेंबरला पूर्ण केली जाणार आहे. यादीची घोषणा आणि निवडणूक चिन्हांचे वाटप एकाच दिवशी करायचे असल्याने बुधवारी ही प्रक्रिया पूर्णत्वास जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँकेचे संचालक मंडळ 17 सदस्यीय आहे. यापैकी सर्वसाधारण संवर्गातील एक जागा अविरोध विजयी झाली असून माजी अध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांचे सुपुत्र अक्षय हे त्या ठिकाणाहून अविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे उर्वरित जागांसाठी ही निवडणूक घेतली जात आहे. या जागांसाठी प्रगती पॅनलचे 17 तर विरोधी शिवाजी पॅनलच्या 12 उमेदवारांसह 30 जण मैदानात आहेत.
यापैकी सत्तेची चावी कुण्याच्या हाती लागेल, हे मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे. सदर निवडणूक अविरोध करण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. परंतु त्यात यश आले नाही. उमेदवारी मागे घेण्याच्या दोन दिवसांत 36 उमेदवारांनी माघारही घेतली. परंतु इतरांनीही त्यांची उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी त्यांचे मन वळविणे शक्य झाले नाही.
श्री. शिवाजी शिक्षण संस्थेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली, शिवपरिवारातील ही महत्वाची वित्तीय संस्था आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे सदर बँकेचा निवडणूक कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. आता पुढील प्रक्रिया 21 डिसेंबरपासून सुरु केली जात आहे. शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने ही बँक असून त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी बँकेच्या निवडणुकीला राजकारणाचा गंध न देता केवळ सभासद व ग्राहकांचे हित लक्षात घेता ती अविरोध करण्यासाठी शहरातील राजकीय नेतेमंडळीनेही पुढाकार घेतला होता. परंतु त्यात कुणालाही यश मिळाले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.