आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र विशेष:नातलगांनी पाठ फिरवली, पण बांधिलकीतून अंत्यसंस्कार केले

अमरावती / वैभव चिंचाळकर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोविड-१९ चा पहिला रुग्ण सापडल्याच्या काही दिवसांतच इतरत्रही रुग्ण आढळण्याची मालिका सुरू झाली. बघता बघता कोरोनाच्या विळख्यात अवघा देश सापडला. कोरोनाने नात्यांची परीक्षा घेतली आणि मूल्यांची कसोटी. पहिल्या लाटेतील संसर्गित रुग्णांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यास नातलगही घाबरत होते. अशा वेळी आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीतून पुढे येण्याचे धैर्य दाखवले अमरावती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नेताम यांनी. खरं तर तेे त्यांच्या व्यावसायिक कर्तव्याच्या पलीकडचे. मात्र, करुणा आणि शौर्य या गुणांच्या अद्भुत संयोगातूनच ते शक्य झाले.

कोरोनाची दहशत आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे कोणीही घराबाहेर निघत नव्हते. मृतांचे आकडे सगळ्यांच्या काळजाचा ठेका चुकवत होते. त्यापेक्षा कठीण परिस्थिती होती ती एखाद्याचा मृत्यू झाल्यावर. अगदी जवळचे नातलगही अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवत होते. अशाच एका रुग्ण महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता आणि पतीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयाने त्यांच्या नातलगांशी संपर्क साधला तर सगळ्यांनी वेगवेगळी कारणे सांगून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अगदी रक्ताची म्हणतात ती सख्खी नातीही. ज्यांना जन्म दिला ती लेकरंही. अशा वेळी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नेताम याच त्यांची लेक बनल्या आणि त्या मृत महिलेवर त्यांनी अंत्यसंस्कार केले.

आपणही समाजाचे काही देणे लागतो आणि हीच ती वेळ आहे समाजाचे ऋण फेडण्याची या शुद्ध भावनेने त्यांनी हा वसा घेतला होता. नातलगांनी नाकारलेल्या पाच कोरोना मृतांवर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अंतिम संस्कार केले. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही, तर कोरोना काळातील एकूणच परिस्थिती बघता महानगरपालिकेद्वारे त्यांनी ५०० मृतांच्या अंतिम संस्कारासाठी रुग्णवाहिकेसह लागेल ती मदतही केली.

नागरिकांमध्ये शिस्त राहावी, त्यांनी अत्यावश्यक कामाशिवाय उगाच घराबाहेर पडू नये, तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे जास्तीत जास्त लोकांनी पालन करावे या उद्देशाने त्या दिवसभर शहरातील रस्त्यावर मनपा पथकासह गस्त घालायच्या. या कालावधीत त्यांनी शहर पिंजून काढले. तोंडाला मास्क न लावणारे, रस्त्यावर विनाकारण फिरणारे अशांवर त्यांनी जरब बसवला.

बातम्या आणखी आहेत...