आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Dr. Statement By Bhimrao Waghmare; Adaranjali On Behalf Of 'Nuta', Pvt. Sateshwar More Did The Work Of Putting Funk On The Grief Of Others| Marathi News

आठवणींना उजाळा:डॉ. भीमराव वाघमारे यांचे प्रतिपादन; ‘नुटा’तर्फे आदरांजली, प्रा. सतेश्वर मोरेंनी केले इतरांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा माणसाला स्वतःच्या दुःखाची जाणीव असते तेव्हा तो चळवळीत येतो. त्यातून नेतृत्व पुढे येते आणि हे नेतृत्व मग इतरांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम करते. प्रा.सत्तेश्वर मोरे हे असेच व्यक्तिमत्त्व होते. अनेक गरीब मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांनी त्या मुलांना आर्थिक व मानसिक पाठबळ दिले पण कधीही त्याची वाच्यता केली नाही.

ही ओळख आहे, प्रा. सतेश्वर मोरे यांची. ‘नुटा’चे ज्येष्ठ पदाधिकारी असलेल्या प्रा. मोरे यांना गतवर्षी कोरोनाने हिरावून घेतले. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी आयोजित व्याख्यानात विद्यापीठाचे निवृत्त परीक्षा नियंत्रक तथा विद्यमान सिनेट सदस्य डॉ. भीमराव वाघमारे यांनी अशा आठवणींना उजाळा दिला.

लेखक, कवी, संघटक म्हणून तर ते मोठे होतेच पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते एक सामाजिक कार्यकर्ता आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व होते, या शब्दात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक व इतिहासतज्ञ डॉ. भीमराव वाघमारे यांनी प्रा.सतेश्वर मोरे यांना त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी आदरांजली अर्पण केली. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात नुटातर्फे आयोजित या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी नुटाचे अध्यक्ष डॉ.प्रवीण रघुवंशी होते.

डॉ. भीमराव वाघमारे यांनी प्रा.सतेश्वर मोरे यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून तर प्राध्यापक, संघटनेचा कार्यकर्ता म्हणून झालेल्या प्रवासावर प्रकाश टाकला. मोरे यांचा सर्व क्षेत्रात वावर असतानाही त्यांनी त्या क्षेत्राचा स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच वापर केला नाही. कुठलाही जातीभेद न पाळता सर्वच जातीतल्या गरीब, अपंग मुलांना त्यांनी सहकार्य केले, असेही वाघमारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी हे संघटनेत आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गेला हे सांगत अत्यंत भावनिक झाले. मोरे यांनी महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे सहसचिव म्हणून आणि नुटाचे पदाधिकारी म्हणून केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. ‘संघटनेचे नेते प्रा. बी.टी.देशमुख यांच्यासोबत काम करायला मिळणे यापेक्षा मोठा आनंद कोणता!’, असे ते नेहमी म्हणायचे. चळवळीला वेळ व बळ देणारा तो सच्चा कार्यकर्ता होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुटा अमरावती शाखेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मेटे यांनी केले तर आभार डॉ. सुभाष गावंडे यांनी मानले.यावेळी सर्व उपस्थितांनी प्रा.सतेश्वर मोरे यांना सामुहिक आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. जय किरण तिडके, नुटा संघटनेचे पदाधिकारी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...