आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त पाणी:सिंचनाच्या अभावाने साठवण क्षमतेच्या आठपट जास्त पाणी यंदा वाहून गेले

रवींद्र लाखोडे | अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाऊस विक्रमी झाल्याने यावर्षी बहुतेक धरणे तुडूंब भरली. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्गही विक्रमी झाला. जिल्ह्यातील एकमेव मोठे धरण असलेल्या अप्पर वर्धा धरणातून आजपर्यंत तब्बल ४१०० दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी सोडावे लागले. या धरणाची क्षमता ५६४ दलघमीची आहे. अर्थात त्या क्षमतेच्या अंदाजे आठ पट पाणी वाया गेले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागण्याची गेल्या १५ वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.

जिल्ह्यात अप्पर वर्धा हा मोठा प्रकल्प असून शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन हे मध्यम प्रकल्प आहेत. तर निम्न पेढी (भातकुली), बोर्डीनाला (अचलपूर), गर्गा (धारणी) आणि पंढरी (वरुड) हे चार मध्यम प्रकल्प निर्माणाधीन अवस्थेत आहेत. आजच्या (गुरुवार) आकडेवारीनुसार, अप्पर वर्धाचा जलसंचय ९७.२३ टक्के असून इतर धरणांचा जलसंचय सरासरी ९७.४८ टक्के आहे. दरम्यान निर्माणाधीन चार धरणे पूर्ण झाली असती तर कदाचित वेगवेगळ्या धरणांमधून जे पाणी सोडावे लागले, त्या पाण्यापैकी काही पाणी त्या धरणांमध्ये साठवता आले असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे या धरणांच्या पूर्णत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला .

बुडीत क्षेत्रात मोठा पाऊस, त्यामुळे विक्रमी विसर्ग
धरणाच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी जिल्ह्यातील बहुतेक धरणांची अधिकतम पातळी (क्षमता) लवकर गाठली गेली. त्यामुळे धऱ्णातून वेळोवेळी पाण्याचा विसर्ग करावा लागला. गेल्या १०-१५ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच ओढवल्याने यावर्षी विक्रमी विसर्ग करावा लागला.-रश्मी देशमुख,अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती.

‘शिल्टींग रेट’ वाढल्यामुळे संचय क्षमता घटली
धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्यासाठी ‘शिल्टींग रेट’ (गाळ साचण्याची क्रिया) वाढणे हेही एक कारण आहे. मुळात पाऊस अधिक झाल्यास धरणाशी जोडलेल्या नद्यांच्या पुरासोबत धरणाच्या दिशेने गाळही वाहून येतो. हा गाळ ठिकठिकाणी अडविण्यासाठी वेगळी ‘ट्रीटमेंट’ करावी लागते. ती योग्य पद्धतीने न केल्या गेल्यामुळे गाळाचे थर धरणाच्या तळाशी जमा होतात. यामुळे धरणाची एकूण जलसंचय क्षमता कमी होते. पर्यायाने पाणी साठवून ठेवणे शक्य होत नाही. ते वेळोवेळी सोडावेच लागते. अप्पर वर्धा धरणाच्या बाबतीत कदाचित तसेच घडले आहे. त्यामुळे विसर्ग विक्रमी झालेला दिसतो. इतर धरणांचीही काहीशी अशीच स्थिती आहे.
-विवेकानंद माथने, ासिंचनतज्ज्ञ, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...