आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासगी ट्रॅव्हल्समुळे एसटीचे महिन्याला ७२ लाखाचे नुकसान होत आहे. संप मिटल्यानंतरही खासगी ट्रॅव्हल्सची एसटी स्थानकाच्या २०० मी. क्षेत्राच्या आत घुसखोरी हाेत असल्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येसह उत्पन्नातही घट झाली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाआधी खासगी ट्रॅव्हल्स एसटी स्थानकाच्या २०० मी. क्षेत्रात दिसायच्याही नाहीत. परंतु, संपादरम्यान त्यांना शासनानेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी थेट एसटी स्थानकातून प्रवासी घेण्यास मुभा दिली होती. आता एसटीचा संप मिटून दोन महिने झाले तरी खासगी ट्रॅव्हल्स बेकायदेशीरपणे बस स्थानकापुढे उभ्या राहात असल्यामुळे प्रवाशांना त्रास होत असून, रहदारीलाही अडथळा निर्माण होत आहे.
एसटीला दिवसाला २ लाख ४० हजाराचा फटका बसत असून, खासगी ट्रॅव्हल्सच्या घुसखोरीमुळे ३० टक्के प्रवासीही घटले आहेत. आॅटो, रिक्षा किंवा इतर वाहनांतून प्रवासी उतरताच त्यांना ट्रॅव्हल्समधून येण्याचा खासगी ट्रॅव्हल्सचे एजंट आग्रह करतात. यामुळे बेजार झाल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत.
मध्यवर्ती बसस्थानक, राजा पेठ बसस्थानक व बडनेरा बस स्थानकाच्या थेट समोर जाऊन खासगी ट्रॅव्हल्स नियमबाह्यपणे प्रवासी घेत आहेत. यासंदर्भात वाहतूक पोलिसांसह राजा पेठ पोलिसांना एसटी आगार व्यवस्थापकांनी पत्र दिले आहे. परंतु, अद्याप पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. एसटीचे दर हे निश्चित आहेत. कोणताही सिझन असला तरी त्यात बदल होत नाही. परंतु, खासगी ट्रॅव्हल्स दिवाळी, उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात दरवाढ करतात.
सध्या मात्र हे खासगी ट्रॅव्हल्स कोणत्याही ठिकाणच्या एसटीच्या तिकिटापेक्षा ५ रु. कमी घेत प्रवाशांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. एकदा का ट्रॅव्हल्स मध्ये बसलो, तिकीट काढली की पश्चात्ताप होतो. कारण ट्रॅव्हल्स प्रत्येक स्थानकावर थांबून प्रवासी घेते. त्यामुळे वेळ वाया जातो. तसेच मोठया प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढल्याने आरामदायक प्रवास होत नाही, अशी माहिती प्रवाशांनी दिली.
शहरातील रहदारीत वाढ
खासगी ट्रॅव्हल्स थेट बस स्थानकापर्यंत येत असल्यामुळे शहरातील रहदारीत वाढ झाली असून त्यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. मनमानी कारभार करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स विरोधात पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांसह शहरासह परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
काय आहे नियम?
कोणत्याही एसटी स्थानकापासून किमान २०० मी.च्या आत खासगी ट्रॅव्हल्सला प्रवेश करता येत नाही किंवा प्रवासी घेता येत नाहीत. प्रवासी घ्यायचे असल्यास २०० मी. अंतराचा नियम पाळून ते घेणे आवश्यक आहे. जर या नियमाचे उल्लंघन होत असेल तर खासगी ट्रॅव्हल्सविरोधात कायदेशीर कारवाई होते.
पोलिसांना पत्र दिले
बडनेरा, राजा पेठ तसेच मध्यवर्ती बस स्थानक व्यवस्थापकांनी वाहतूक व शहर पोलिसांना खासगी ट्रॅव्हल्सच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीबाबत पत्र दिले आहे.
-श्रीकांत गभणे, विभागीय नियंत्रक.
३० टक्के प्रवासी घटले
खासगी ट्रॅव्हल्स बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे एसटीचे ३० टक्के प्रवासी घटले असून आर्थिक नुकसान होत आहे.
-संदीप खवले, मध्यवर्ती आगार व्यवस्थापक,अमरावती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.