आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलबाजार:विवाह समारंभांमुळे फुले, हार, पुष्पगुच्छांचेे भाव वधारले ; वाहन सजावटीसाठीही वाढती मागणी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या मोठ्या प्रमाणात विवाह मुहूर्त असल्याने विवाह समारंभही धूम-धडाक्यात साजरे होत आहेत. आनंदाच्या प्रसंगी विविध फुलांचा मांडव, हार, फुलांचा गुच्छ, वरातीमधील कारची सजावट यासाठी फुलांना मागणी वाढल्यामुळे सध्य त्यांचे भाव चांगलेच वाढले आहेत. हारांची किंमत आकार व दर्जानुसार ७०० रु. पासून ७ हजार रुपयांपर्यंत आहे. कार सजावटीसाठी १५ हजार रुपये, मांडव सजवण्यासाठी १ लाख रु.पर्यंत खर्च केला जात आहे.

विवाह समारंभात आकर्षणाचे केंद्रबिंदू राहणारे वर-वधूचे स्टेज सजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर केला जातो. यासाठी १ लाखापर्यंत खर्च होतो. हारही चांगलेच महागडे असून, सुबक, नाजूक हार तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. तसेच ते ताजे दिसावेत म्हणून जपूनही ठेवावे लागतात. अगदी ७०० रु. पासून ते ७ हजारापर्यंत हे हार बाजारात उपलब्ध आहेत. यात पुष्पगुच्छाची किंमत अंतर्भूत असते.

वरातीसाठी अनेकजण घरी असलेल्या किंवा भाड्याने मिळणाऱ्या कारचा वापर करतात. या कार सजवण्याचा खर्च हा १५ हजारापर्यंत येतो. यासाठी फुलांची चादर, पुष्पगुच्छ, रिबन, नेटचा वापर केला जातो.जिल्ह्यात फुलांच्या शेतीसाठी फारसे उपयोगी वातावरण नसल्याने त्यांची फारशी शेती केली जात नाही. परंतु, लोणटेक, रेवसा, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काही भागांत झेंडू, लिली, शेवंतीचे पिक घेतले जाते. मात्र, शहरात नाशिक, मुंबई, पुणे, बेंगळुरू येथून फुले मागवली जातात. त्यात शेवंती, मगर, निशिगंध, मोगरा, झेंडू, गुलाब, कार्नेशियन, आॅर्किड या फुलांचा समावेश आहे.

सध्या बाजारात विविध प्रकारच्या फुलांचे हार मिळतात. मोगऱ्याच्या कळीप्रमाणे दिसणारा मगर हा फुलांचा प्रकार फारच महागडा आहे. तो किमान तीन दिवस तसाच राहतो. त्यामुळे त्यापासून हार तसेच मंडप सजावटीचे काम केले जाते. गुलाबाच्या पाकळ्या दुमडून व उलट्या करून त्याला मगरची जोडी दिली जाते. तसेच वर मोती, चमकी जोडली जाते. त्यामुळे हे हार नाजुक दिसत असले तरी मजबूत असतात. तसेच जशा प्रकारचा व रंगाचा हार हवा, त्यानुसार तो तयार करून दिला जातो, अशी माहिती हार विक्रेत्यांनी दिली.

सध्या किंमती वाढल्या आहेत विवाहांचा सिझन सुरू असल्याने ठोक बाजारातच फुले महाग मिळत असल्याने तसेच वर-वधूसाठी हार तयार करण्यासाठी फुले निवडून आणावी लागत असल्याने त्यांच्या किंमती वाढल्या आहेत. -सुजाण रांजणकर, हारांचे विक्रेते.

बातम्या आणखी आहेत...