आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या रिंगणात:शिवाजी संस्थेची आज निवडणूक; सत्तेचा मतदानाद्वारे होणार फैसला

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या नऊ शिलेदारांसाठी (कार्यकारी मंडळ) शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानुसार अध्यक्षपदासाठी दोन, कोषाध्यक्ष पदासाठी दोन, तीन उपाध्यक्ष पदासाठी ७ आणि कार्यकारिणी सदस्याच्या चार जागांसाठी १० जणांनी दावा केला आहे. यापैकी विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याचा फैसला उद्या, रविवारच्या मतमोजणीनंतर होईल.

या संस्थेची पंचवार्षिक आमसभा शनिवारी सकाळी श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात झाली. या सभेनंतर लगेच त्याठिकाणी इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. मावळते अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनल व उपाध्यक्ष नरेश चंद्र ठाकरे (जे स्वत: यावेळी अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत) यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनलने यापूर्वीच नऊ-नऊ उमेदवारांची घोषणा केली होती. याशिवाय ऐन वेळेवर उपाध्यक्ष पदासाठी एक तर सदस्य पदासाठी दोन अपक्षांनी उमेदवारी दाखल केली. त्यामुळे नऊ सदस्यीय कार्यकारी मंडळासाठी एकूण उमेदवारांची संख्या २१ वर जाऊन पोहोचली आहे.

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या या शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक रविवार, ११ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यासाठी दुपारी १ ते ३ या वेळात उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. त्यानंतर दोन तासांनी छाननी करुन पात्र नामांकनाची यादी घोषित करण्यात आली. पुढचा एक तास उमेदवारी मागे घेण्यासाठी देण्यात आला होता. त्यानुसार सायंकाळी ६.३० वाजता उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात आली. त्यामध्ये २१ उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडीनुसार विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनल आणि उपाध्यक्ष नरेश चंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वातील विकास पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. हर्षवर्धन देशमुख यांच्या कार्यकारिणीतील उपाध्यक्ष नरेश चंद्र ठाकरे व कार्यकारिणी सदस्य केशवराव मेटकर यांनी इतर सात नव्या सवंगड्यांना सोबत घेत विकास पॅनलची स्थापना केली आहे.

तर स्वत:सह जुने सहा सहकारी आणि इतर तिघांना सोबत घेत हर्षवर्धन देशमुख यांनी ‘प्रगती’चा झेंडा रोवला आहे. प्रगती पॅनलमध्ये स्वतः हर्षवर्धन देशमुख, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र शेळके व अॅड. गजानन पुंडकर आणि कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ व केशवराव गावंडे यांचा समावेश आहे याशिवाय उपाध्यक्षपदासाठी अॅड जयवंत पाटील पुसदेकर तर कार्यकारिणी सदस्यांसाठी सुरेश खोटरे आणि सुभाष बन्सोड या तीन नव्या उमेदवारांची साथ त्यांना लाभली आहे. तर दुसरीकडे ठाकरे यांच्या पॅनलमध्ये अध्यक्षपदासाठी ते स्वत:, उपाध्यक्ष पदासाठी विधान परिषदेचे उपसभापती राहिलेले प्रा. शरद तसरे, डॉ. अशोकराव अरबट व केशवराव मेटकर, कोषाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब वैद्य आणि कार्यकारिणीच्या चार सदस्यपदांसाठी रमेश हिंगणकर, सुरेंद्र अंाडे, दिनकर गायगोले आणि नरहरपंत होले यांनी दावेदारी दाखल केली आहे. तर अपक्ष उमेदवार कवी डॉ. विठ्ठल वाघ (उपाध्यक्ष पदासाठी), आनंद देशमुख व डॉ. प्रमोद झाडे यांनी उमेदवारी घोषित केली.

बातम्या आणखी आहेत...