आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​महावितरणची कारवाई:जिल्ह्यात 32 लाखांची वीजचोरी, वीजहानीचे प्रमाण 67 टक्क्यांवर ; कडबीबाजार, भाजीबाजारात दरदिवशी धाडी

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कडबी बाजार आणि भाजी बाजार परिसरात महावितरणने विविध ठिकाणी मारलेल्या धाडीत तब्बल ३२ लाख रुपयांच्या वीज चोऱ्या उघड झाल्या आहेत. दरम्यान, या भागात तब्बल ६७ टक्क्यांपर्यंत वीज हानी पोहोचली असल्यामुळे आता दरदिवशी वीजचोरी पकडण्यासाठी महावितरण धाडी मारणार आहेत.

कडबी बाजार आणि भाजी बाजार परिसराला ताज, चित्रा आणि इमाम नगर फिडरद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. या परिसरात वाढलेल्या वीज चोरीमुळे या वाहिन्यांची वीज हानी ही सरासरी ६७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तसेच वीज चोरीमुळे यंत्रणा भारीत होऊन शॉर्ट सर्किट होते, त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा त्रास प्रामाणिकपणे बील भरणाऱ्या ग्राहकांना होतो आहे. शिवाय महावितरणला लाखो रूपयांचे नुकसान होत असल्याने यापुढे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता आनंद काटकर आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय कुटे यांच्या नेतृत्वात या भागात दररोज वीजचोरी पकडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

वीज मीटरमध्ये फेरफार तसेच छेडछाड केल्यास महावितरणकडून वीज ग्राहकांवर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. १ ते ८ सप्टेंबर दरम्यान शहरातील भाजी बाजार आणि कडबी बाजार परिसरात मारलेल्या धाडीत ६७ ठिकाणी १ लाख ८१ हजार ९०० युनिटची म्हणजेच सुमारे ३२ लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचे उघड करण्यात आले आहे.

वीजचोरी पकडल्यास असा दंड,शिक्षेची तरतूद वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर वीजचोरी केलेल्या युनिटच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येते. प्रति ‘केडब्ल्यूएचपी’नुसार औद्योगिक ग्राहकावर १० हजार रुपये, वाणिज्यिक ग्राहकावर ५ हजार रुपये तर इतर वर्ग वारीतील ग्राहकावर २ हजार रुपये दंडात्मक कारवाई म्हणून तडजोडीचे शुल्क आकारण्यात येते. गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्या विरुद्ध विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी थेट विजेच्या खांबावरून वीज चोरी करणे किंवा मीटर बंद करुन त्यात छेडछाड करुन वीज चोरी करणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...