आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात दोन स्वतंत्र आंदोलने:‘पेट्रोल-डिझेल शंभर पार, मोदी बस करा जनतेची लूटमार’ म्हणत काँग्रेस, सेनेचा एल्गार

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इर्विन चौकात काँग्रेसचा डेरा, तर राजकमल चौकात सेनेची ‘चाय पे चर्चा’

बेसुमार भाववाढीवर बोट ठेवत ‘पेट्रोल-डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लूटमार...’ या भूमिकेतून जनतेने महागाईविरुद्ध एल्गार पुकारला आहे. काँग्रेसने सोमवारी दुपारी इर्विन चौकात धरणे दिले. तर राजकमल चौकात सकाळी चुलीवर चहा शिजवून सेनेने ‘चाय पे महागाईची चर्चा’ केली.

पंतप्रधान नेहमी ‘चाय पे चर्चा’ करतात. आता त्यांनी महागाईवरही जनतेशी ‘चाय पे चर्चा’ करावी, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पाच राज्यातील निवडणुका संपताच केंद्र सरकारने आपला छुपा अजेंडा उघड केला असून महागाई वाढवत नागरिकांचे कंबरडे मोडले, असा काँग्रेसचा आरोप आहे.

हिटलरशाही खपवून घेणार नाही : पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. दररोज भाववाढ सुरू आहे. केंद्र सरकारने चालविलेली ही हिटलरशाही आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना जाब द्यावाच लागेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी दिली. तर केंद्र सरकारने नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडवले असून हा तर महागाईचा स्फोट आहे, या शब्दात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी केंद्रावर टीका केली.

सेनेने चुलीवर उकळवला चहा : पंतप्रधान दर आठवड्याला ‘मन की बात’ करतात. यापूर्वी चाय पे चर्चा कार्यक्रम राबवला होता. त्याच कार्यक्रमाची आठवण करुन देत भाजपने आता महागाईवरही चर्चा करावी, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. सिलिंडर महाग झाल्यामुळे नागरिक पुन्हा चुलीकडे वळले आहेत. ग्रामीण भागातील हेच चित्र सार्वजनिक करण्याच्या दृष्टीने जिल्हाप्रमुख सुनील खराटे व दिनेश बूब यांनी सोमवारी सकाळी राजकमल चौकात चुलीवर चहा उकळवला. हा चहा तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना देत केंद्र सरकारवर लक्ष्यवेध केला. आंदोलनात माजी जिल्हा प्रमुख प्रदीप बाजड, माजी नगरसेवक भारत चौधरी, युवा सेनेचे प्रवीण हरमकर, माजी नगरसेविका वर्षा भोयर, भाग्यश्री जठाळे, ज्योती औगड, सारिका जयस्वाल आदी शिवसैनिक सहभागी झाले.

सिलिंडर डोक्यावर घेत काँग्रेसचा डेरा
‘महागाईमुक्त भारत’ सप्ताहांतर्गत काँग्रेस पक्षाने इर्विन चौकात धरणे देत निदर्शने केली. एक दुचाकी आणि दोन सिलिंडरला (व्यवसायिक व घरगुती) पुष्पमाला अर्पण करुन मूठमाती देण्यात आली. पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मते केंद्रातील भाजप सरकारने पाच राज्यातील पराभवाच्या चिंतेने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किंमती रोखून धरल्या होत्या. परंतु निवडणुका संपताच पुन्हा दरवाढ करून जनतेची लूट सुरू केली आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, याचा तोडगा केंद्र शासनाकडे नाही, त्यामुळे केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात काँग्रेसने महागाई मुक्त भारत सप्ताह हे आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, गिरीश कराळे, महेंद्रसिंग गैलवार व गणेश आरेकर, प्रकाश काळबांडे, हरिभाऊ मोहोड, परीक्षित जगताप, विक्रम ठाकरे, विनायकराव ठाकरे, छाया दंडाळे दिलीप काळबांडे आदी आंदोलनात सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...