आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण घेत असतानाच आवड जपता यावी आणि रोजगाराचीही सोय व्हावी, यासाठी श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात नवे आठ ‘अॅड. ऑन’ अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. रोजगाराच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध आहेत, परंतु विद्यार्थ्यांमध्ये रोजगार निर्मितीक्षम कौशल्ये विकसित झाली नसल्याने ती उणीव कायम आहे. ही उणीव या अभ्यासक्रमामुळे भरुन निघणार आहे.
या अभ्यासक्रमांची घोषणा श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. वि. गो. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांच्याच हस्ते ॲड-ऑन कोर्सेसमधील सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंटची कार्यशाळा आणि पीएचडी कोर्स वर्क चे उद्घाटनही करण्यात आले. प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या आयक्यूएसी कक्षाचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे आणि जनसंवाद विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. कुमार बोबडे उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे सचिव डॉ. वि.गो. ठाकरे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण कौशल्य विकसित झाले पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शनाची नेहमी गरज असते. तो स्पर्धेत टिकला पाहिजे, यासाठी महाविद्यालयाने नेहमी तत्पर राहावे. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थी तयार व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी उपस्थितांच्या लक्षात आणून दिले.
नव्याने सुरु झालेल्या या आठ अभ्यासक्रमांमध्ये कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश (इंग्रजी विभाग) , वक्तृत्व, निवेदन कौशल्य व कार्यक्रम व्यवस्थापन (मराठी विभाग), मॉडर्न फार्मिंग टेक्निक्स अँड नर्सरी मॅनेजमेंट (अर्थशास्त्र), बिझनेस डाटा प्रोसेसिंग अँड सायबर सिक्युरिटी (वाणिज्य विभाग), भारतीय पंचायत राज व्यवस्था (राज्यशास्त्र विभाग), रिसर्च मेथॉडॉलॉजी (भूगोल विभाग) इव्हेंट मॅनेजमेंट अँड पब्लिक रिलेशन (जनसंवाद व पत्रकारिता विभाग), न्युट्रीशनल डायट अॅण्ड हेल्थ (गृहअर्थशास्त्र विभाग) या विषयांचा समावेश आहे. या कोर्सेसची माहिती डॉ. वैशाली देशमुख, डॉ. राजेश मिरगे, डॉ. किशोर साबळे, डॉ. बबन झरे, डॉ. संगीता भुयार, डॉ. कुमार बोबडे यांनी दिली. तर सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट वर्कशॉपची मांडणी डॉ. मनोज जोशी यांनी केली.
दरम्यान महाविद्यालयात वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन होत असते. यापैकी काही कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांनी निरिक्षण केल्यास बरेच काही शिकता येऊ शकते. अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन रोजगार निर्मितीक्षम कौशल्ये विकसित होण्याच्यादृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे असल्याने हे अभ्यासक्रम सुरु करण्यात येत असल्याचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. त्याचवेळी तीस तासांच्या ॲड -ऑन कोर्सेसच्या माध्यमातून खूप काही वेगळे शिकायला मिळेल. आव्हानात्मक काळात याचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल, असे डॉ. महेंद्र मेटे यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.