आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खादी उद्योगातून महिलांना रोजगाराच्या संधी; जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे प्रतिपादन

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

\खादी निर्मितीच्या उद्योगातून शहरी व ग्रामीण भागातील गरजू महिलांना कायम रोजगार उपलब्ध होऊ शकतो. खादीचा प्रचार व प्रसार तसेच खादी वापराला प्रोत्साहन दिल्यास या क्षेत्रात उद्योग व रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करता येतील. या माध्यमातून महिला सक्षमीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सोमवारी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि कस्तुरबा सौर खादी महिला समितीतर्फे बडनेरा रस्त्यावरील तापडिया सिटी सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर खादी उत्सव प्रदर्शन सुरू झाले. हे प्रदर्शन १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुत्तेमवार, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, तापडिया सिटी सेंटरचे कार्यकारी संचालक मधूर लढ्ढा, कस्तुरबा समितीच्या पदाधिकारी रूपाली खडसे, प्रणिता किडिले, कल्पना शेंडोकार, वर्षा चौधरी व वर्षा जाधव या वेळी उपस्थित होते. या प्रदर्शनात खादीपासून तयार केलेली महिला, बालके, ज्येष्ठ, युवक आदी सर्वांसाठीची वस्त्र प्रावरणे विक्रीस उपलब्ध आहेत. खादी सर्वदूर पोहोचावी यासाठी नवनव्या बाजारपेठांचा शोध घेऊन ब्रँड डेव्हलप करण्याचा प्रयत्न होत आहे, असे खडसे यांनी यावेळी सांगितले.

महिलांनी महिलांसाठी राबवलेला एकमेव प्रकल्प कस्तुरबा सौर खादी महिला समिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्यापासून कच्चा माल तयार करते. हा कच्चा माल घेऊन विविध गावातील बचत गटातील महिलांकडून चरख्यावर सूतकताई केली जाते. त्यानंतर त्यापासून सौर खादी कापड व विविध सौर खादी उत्पादनांची निर्मिती होते. या प्रकल्पात अमरावती जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त महिलांना कायमस्वरूपी रोजगार प्राप्त झाला आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील १०० आदिवासी महिलांचा समावेश आहे. तसेच धारणी तालुक्यातील मांडू या गावी विणकाम केंद्र स्थापन केले असून, तेथील १५ पेक्षा जास्त युवक- युवतींना उदरनिर्वाहासाठी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती चेचरे यांनी या वेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...