आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासौर उर्जा प्रकल्पासाठी चांदूर रेल्वे तालुक्यातील तुळजापुर, राजना, वाई, शिरजगाव (कोरडे) या शिवारातील शेतजमिनींचा अकृषक म्हणून वापर केल्याप्रकरणी आवादा एमएच स्टेनेबल, प्रा. लि. नोयडा (उत्तप्रदेश) या कंपनीला या पुर्वी १ कोटी ९० लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. दरम्यान या प्रकल्पासाठी संबंधित कंपनीने राजना येथील शेतकऱ्याच्या शेतात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुसाकन होत आहे. वारंवार प्रशासनाने उंबरठे झिजवूनही काहीच फायदा होत नसल्याने शेतकऱ्याने ५० लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
चांदूर रेल्वे शहरातील भगवंत चौक येथील रहिवासी शेतकरी गजानन महादेव गुल्हाने यांच्या मालकीचे राजना शिवारात चार एकर शेत असून मागील २५ वर्षांपासून ते या शेताच्या भरोशावर कुटुंबाचा प्रपंच चालवत आहेत. मात्र संबंधित कंपनीने त्यांच्या अपरोक्ष शेतामध्ये कुंपण घालून शेताचे दोन भाग केले.
त्यानंतर काही दिवसात याच शेतात पोल उभारून त्याचे क्राँक्रिटीकरण केले. परिणामी सिमेंटमुळे शेतातील जमिनीमध्ये मिसळले गेले. त्यामुळे जमिनीचा पोत घसरून त्याचा परिणाम पिकांवर झाला. त्यामुळे कंपनीने नुकसानापोटी ५० लक्ष रुपयांची भरपाई द्यावी तसेच त्यांच्या शेतामध्ये जे काही अतिक्रमण काम केले आहे, ते तत्काळ हटवावे, अशी मागणी त्यांनी तहसीलदार व पोलिस स्टेशनला निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार कंपनीला नोटीस देवून हजर राहण्यास सांगीतले. मात्र संबंधित कंपनीकडून ४ मेपर्यंत कुठलेही अधिकारी-कर्मचारी हजर झाले नसल्याचे गुल्हाने यांनी सांगीतले. या संदर्भात गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांच्याकडेदेखील आपली कैफियत मांडली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.