आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव उत्साहात साजरा:दहा दिवसांच्या तीज उत्सवाची सांगता

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजांरा संस्कृतीचा महत्वाचा एक भाग आणि मांगल्याचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या तीज उत्सवाचे बंजारा समाजबांधवाच्या वतीने अमरावती महानगर तांड्यात आयोजित तीज उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. एकूण दहा दिवस चालणारा तीज उत्सव हा विशेषता महिलांचा उत्सव असून तरुणींसाठी या उत्सवात विशेष महत्व आहे.

यावेळी समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयसिंग राठोड, तर प्रा. अमरसिंग राठोड, चंदनसिंग राठोड, राम पवार (नायक), प्रकाश चव्हाण (आसामी), हिरालाल जाधव (कारभारी),मनोहर चव्हाण (हसाबी), ॲड. राम आडे (नसाबी) आदींची प्रमुख उपस्थिती होती. दिनांक ११ ते २१ ऑगष्ट दरम्यान या उत्सवाचे अमरावती तांड्यात वेगवेगळ्या ठिकाणी विशेष आयोजन करण्यात आले होते.

पुर्वीच्या काळी दळण-वळणाचा अभाव असतांना शेकडो संस्थाने व राज्ये यांची जीवनावश्यक साहित्ये, जड-जवाहीरे, रत्ने आदी पुरविण्याचे काम बैल किंवा गाईच्या पाठीवर लादून बंजारा समाजाकडून करण्यात येत असे, याला लदेणी म्हटल्या जात असत. बंजारा समाजाच्या एका वस्तीला तांडा म्हटल्या जाते. ट्रान्सपोर्टचा मुख्य व्यवसाय करणारा हा समाज त्याकाळात वातावरणातील बदलामुळे विशेषता पावसाळ्यात एका ठिकाणी दोन ते तीन महिने थांबत असत. या दरम्यान सोबतीला काही दुसरे तांडेही त्यांना मिळायचे. त्यामुळे एक संस्कृती- एक बोली असणाऱ्या या तांड्यात मुली बघण्याचे आणि लग्नही लावल्या जात. त्यामुळे पुन्हा कधी भेटणार याची निश्चिती नसल्याने लग्न होणाऱ्या मुलींना आईवडिलांचा विसर पडावा, यासाठी हा उत्सव साजरा केला.

परंतू आजही या समाजाकडून तीज उत्सवाची संस्कृती जतन करण्यात आली आहे. मुळात नायक हा तांड्याचा प्रमुख असल्याने या उत्सवाची सुरूवात तांडा नायकाच्या घरापासून होते. संगीतप्रेमी असलेल्या बंजारा भगीनी गाण्यात आणि डफलीच्या तालात तल्लीन होऊन उत्सव काळात नाचतात. ईश्वराची आराधना, भेटीचा आनंद आणि विरहाचे दु:ख आदी भावभावना गाण्यातून व्यक्त केल्या जातात.

अमरावती महानगराचा विस्तार फार मोठा आहे . त्यामध्ये शंकरनगर, अर्जुननगर, रविनगर, मंगलधाम परिसर, विदर्भ महाविद्यालय परिसर इत्यादी भागात राहणारे बंजारा समाज बांधव आपापसात ठरवून कार्यक्रमाचे आयोजन करतात. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहन चव्हाण, डॉ. सुगत चव्हाण, विशाल जाधव, उमेश राठोड, बालकराम जाधव, शालिकराम राठोड, राजकुमार जाधव, कैलास राठोड यांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली. याशिवाय या कार्यक्रमात संपूर्ण तांड्यातील स्त्री - पुरुषांचा सहभाग असतो. संपूर्ण शहर या काळात गीत नृत्याच्या तालासुराने गजबजून गेले होते.

बातम्या आणखी आहेत...