आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संगाबा’ विद्यापीठाचा गोंधळ:‘इंग्रजी लिटरेचर’ची प्रश्नपत्रिका निघाली जुन्या अभ्यासक्रमाची, 15  मिनिटांनी चूक कळल्यावर महाविद्यालयांना पाठवला नवा पेपर

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शुक्रवार १७ रोजी बीए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी वाङ्मयाचा पेपर होता. परंतु, दुपारी २ वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर त्यांच्या हाती जुन्याच अभ्यासक्रमाचा (सिलॅबस) पेपर आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला. ही चूक विद्यापीठ परीक्षा नियंत्रण विभागाच्या लक्षात आल्यानंतर १५ मिनिटाने साॅफ्टवेअरवर नव्या अभ्यासक्रमानुसार पेपर अपलोड करण्यात आला. मात्र या गोंधळात विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला. तसेच त्यांना मन:स्तापही सहन करावा लागला.

कोरोनामुळे २ वर्षे ऑफलाईन परीक्षा झाली नाही. सध्या संगाबा अमरावती विद्यापीठाद्वारे परीक्षा घेतली जात असून बीए, बीएससी अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू आहेत. बीए द्वितीय वर्ष नव्या अभ्यासक्रमाचा इंग्रजी वाङ्मयाचा पहिलाच पेपर होता. परंतु, विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रण विभागात माॅडरेशनची चूक झाली. नव्या अभ्यासक्रमाच्या पेपरऐवजी ४ वर्षे आधीच्याच जुन्या अभ्यासक्रमाचे पेपर पाकिटात टाकून परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात आले. त्यामुळे परीक्षेला बसलेले या अभ्यासक्रमाचे १५०० विद्यार्थी थक्क झाले. नंतर ही बाब केंद्र अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. व परीक्षा नियंत्रण विभागाला कळली. १५ मिनिटांत त्यांनी पाचही जिल्ह्यांमध्ये साॅफ्टवेअरद्वारे नव्या अभ्यासक्रमाचे पेपर पाठवले. यात विद्यार्थ्यांचा जेवढा वेळ वाया गेला, तेवढा जास्त वेळ त्यांना पेपर सोडवण्यासाठी देण्यात आला. दोन वर्षांपासून लिहिण्याची सवय तुटल्यामुळे आधीच विद्यापीठाने ३० ते ४५ मिनिटे विद्यार्थ्यांना जास्तीची दिली होती.
धक्काच बसला, वेळही वाया गेला ः चार वर्षे जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर समोर आल्यानंतर धक्काच बसला. याबाबत परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना माहिती दिली. यात ४५ मिनिटे वाया गेली. ज्यावेळी नव्या अभ्यासक्रमाचा पेपर हाती आला तेव्हा हायसे वाटले. अशी प्रतिक्रया सुकाश नौसारे या विद्यार्थ्याने दिली.

पाचही जिल्ह्यात १७७ केंद्रावर परीक्षा सुरू ः संगाबा अमरावती विद्यापीठाद्वारे १० जूनपासून परीक्षांना सुरुवात झाली. १७ जूनपासून पाचही जिल्ह्यातील १७७ परीक्षा केंद्रांवर बीए व बीएससी अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू झाली. कोरोनामुळे दोन वर्षे परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. आॅनलाईन परीक्षेतही अडचणी आल्या. आता मात्र ऑफलाईन परीक्षा सुरू झाली आहे.

१५ मिनिटांतच चुकीची दुरुस्ती केली
सर्व काॅलेजला नव्या अभ्यासक्रमानुसार इंग्रजी वाङ्मयाचा पेपर पाठवला. माॅडरेशनची पाकिटे बदलल्यामुळे चूक झाली. विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यास वाढीव वेळही दिली. डाॅ. हेमंत देशमुख, परीक्षा नियंत्रक, सं.गा.बा.अमरावती विद्यापीठ

बातम्या आणखी आहेत...