आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:प्रस्ताव मंजूर होऊन 6 महिने झाल्यावरही मिळाली नाही कोरोनाची आर्थिक मदत

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रस्ताव मंजूर होऊन ६ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही कोरोनाने मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. रेवननाथ अंबादास सावरकर असे कुटुंबप्रमुखाचे नाव असून ते येथील जय नगरात राहतात. त्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले. त्यांचा अर्ज मंजूरही झाला. परंतु अद्याप मदत मिळाली नाही.सावरकर यांच्या आई, कमलाबाई अंबादास सावरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे मदत मिळण्यासाठी त्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केला आहे.

पडताळणीनंतर तो अर्ज मंजूर झाल्याचेही त्यांना कळवण्यात आले. एवढेच नव्हे तर बँक ऑफ बडोदा येथील त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा संदेशही त्यांना पाठवण्यात आला. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांचा खाते क्रमांक हा विशिष्ट अंकाने सुरू झाला असल्याने अशा सर्व खातेदारांची रक्कम परत गेली, असे सांगण्यात आले. शिवाय आमचा पाठपुरावा सुरू असून रक्कम पंधरा दिवसांत जमा होईल, असेही कळवण्यात आले.

परंतु असा संदेश मिळण्याला तीन महिने उलटले तरीही रेवननाथ सावरकर यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही.दरम्यान सावरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पुन्हा एकदा तक्रार नोंदवली असून, त्यांच्या अर्जावर लवकरच तोडगा निघेल, असे अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले. या आश्वासनामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून रक्कम न मिळाल्यास नाईलाजाने प्रशासनाविरुद्ध आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...