आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय अनागोंदी:स्वातंत्र्यदिन आटोपला तरी जिल्ह्यातील अडीच लाखांवर विद्यार्थी गणवेशाविनाच

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातील असे, शिक्षण विभागाने दावा केला होता. मात्र, निधीअभावी जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ७७६ विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याची स्थिती सध्या १,५८६ शाळांची आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन हा नव्या गणवेशाविनाच साजरा करावा लागला. तत्पूर्वी, स्वातंत्र्यदिनाच्या तीन दिवसांपूर्वीच सर्वच शाळांना निधी वाटप झाला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे शाळांना वेळेवर निधी पोहोचला नसल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांचे म्हणणे आहे.

गत वर्षापासून शासनाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत मिळणारा सर्व प्रकारचा निधी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा (पीएफएमएस) प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध केला जातो. त्यासाठी सिंगल नोडल अकाउंट (एसएनए) म्हणून राज्यस्तरावर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ची निवड केली. परंतु, बँकेची यंत्रणा व तांत्रिक बाबीमुळे ही प्रणाली योग्यप्रकारे कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे समग्र शिक्षाच्या इतर अनुदानासोबतच विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेचा निधी पीएफएमएस प्रणाली किचकट असल्याने निधी मिळण्यास अडचण येत असल्याचे शाळांचे म्हणणे आहे. राज्य शासनाने सिंगल नोडल अकाउंटसाठी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ऐवजी ‘एचडीएफसी’ बँकेची निवड केली आहे. सर्व शाळांचे बचत खाते आता एचडीएफसी बँकेत उघडावे लागणार आहे.

तसेच वारंवार बँक खाते काढणे शाळांना अडचणीचे होत आहे. ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात निवड केलेल्या बँकेच्या शाखा नाही. त्यामुळे बँक खाते कसे काढावे, ही अडचणही शाळांसमोर आहे. पूर्वीप्रमाणे जिल्हास्तरावर शासनाने निधी पाठवावे तेथून तालुकास्तरावर निधी द्यावा आणि पंचायत समिती स्तरावरुन थेट शाळांच्या खात्यावर जमा करावा हीच पद्धत योग्य असून, वेळेवर शाळांना निधीही प्राप्त होईल तसेच आणि वारंवार शाळांना नवीन खातेसुद्धा काढावे लागणार नाही. त्यामुळे ‘पीएफएमएस’ ही पद्धत न वापरता पूर्वीची पद्धत वापरावी आणि शाळांना निधी द्यावा, अशी मागणी मुख्याध्यापक करत आहेत. तत्पूर्वी यंदाच्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५८६ शाळा आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ही २ लाख ४२ हजार ७७६ आहे. यातील सर्व मुले- मुली एस.सी, एस.टी, ओबीसी, बीपीएल विद्यार्थ्यांना ६०० रुपयाचे दोन गणवेश मिळायला पाहिजे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत आहे. म्हणून अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे. मात्र, यंदाचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिन हा गणवेशाविनाच साजरा झाला आहे.

शाळांच्या मुख्याध्यापकांची झाली आर्थिक कोंडी
लवकरच निधी उपलब्ध होईल, त्यामुळे गणवेश खरेदी करा, अशा सूचना गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. मुख्याध्यापकांनी त्यानुसार गणवेश खरेदी केले परंतु, दीड महिन्याचा कालावधी उलटूनही निधी मिळाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुख्याध्यापकांची आर्थिक कोंडी झाली. काही मुख्याध्यापक यांनी स्वतः खर्च करुन उधारीवर गणवेश खरेदी केलेले आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विद्यार्थी गणवेशात दिसावे म्हणून मुख्याध्यापक यांनी अशी पद्धत अवलंबली होती.

बातम्या आणखी आहेत...