आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव मुदतीनंतरही विधान परिषदेचा मतदार सुस्तच:गतवेळच्या तुलनेत निम्मीच नोंदणी; आतापर्यंत 37 हजार जणांची नोंद, पुन्हा मुदतवाढ

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचा पदवीधर मतदार अजूनही सुस्तच आहे. आज, बुधवार, 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीची प्रारुप मतदार यादी घोषित झाली. त्यानुसार सदर मतदारसंघात 37 हजार 380 मतदारांची नावे समाविष्ट झाली आहेत. ही संख्या गेल्यावेळच्या 76 हजार या मतदारसंख्येच्या तुलनेत निम्मीच आहे. त्यामुळे आजपासून पुन्हा नवे अभियान सुरु झाले असून अजूनही नावे नोंदविण्यापासून दूर सारलेल्या पदवीधर मतदारांनी आगामी 9 डिसेंबरच्या आंत स्वत:ची नावे नोंदवून घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी अमरावती शहरातील सहा ठिकाणांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 18 जागी व्यवस्था करण्यात आली होती. सर्व तहसील कार्यालये आणि मनपाची झोन कार्यालये याठिकाणी मतदार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय काही दिवस विशेष शिबिरेही घेण्यात आली. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालय आणि अमरावतीचे एसडीओ कार्यालय याठिकाणी एक खिडकी योजनाही राबविण्यात आली.

परंतु तरीही नोंदणीने फारसा वेग घेतला नाही. आतापर्यंत केवळ 37 हजार 380 पदवीधरांनी त्यांच्या नावांची नोंदणी केली आहे. अर्थातच अमरावती शहर यामध्ये आघाडीवर असून काही तालुक्यांचे आकडे साधा हजाराचा अंकही पार करु शकले नाहीत, एवढे मागे आहेत.

गेल्यावेळी या मतदारसंघात एकूण 2 लाख 10 हजार मतदार होते. त्यापैकी 76 हजार पदवीधर हे एकट्या अमरावती जिल्ह्यातील होते. 20 टक्के नैसर्गिक वाढ या सूत्रानुसार एकूण मतदार नोंदणी ही अडीच लाखावर जाईल आणि त्यात जिल्ह्यातील मतदारांची संख्या किमान 80 हजार असेल, असा अंदाज त्यावेळी निवडणूक अधिकारी या नात्याने विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे व सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी व्यक्त केला होता. परंतु प्रत्यक्षात अमरावती जिल्ह्याची नोंदणी 37 हजार 380 मतदारांवरच थांबली आहे. त्यामुळे यंत्रणेने अधिक वेगाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला असून 9 डिसेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर 30 डिसेंबर रोजी या मतदारसंघाची अंतीम मतदार यादी घोषित केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांनी काढली होती सायकल फेरी

विधान परिषदेच्या निवडणुकीतील पदवीधरांचा टक्का वाढावा यासाठी 7 नोव्हेंबरला सनदी अधिकाऱ्यांनी मतदार जागरुकता सायकल फेरी काढली होती. मुळात मतदार नोंदणीचा पहिला टप्पा त्याच दिवशी संपुष्टात आला होता. परंतु प्रतिसाद अल्पसा असल्याने स्वत: विभागीय आयुक्तांनी रॅलीत सहभाग घेतला होता. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर आदींनी त्या रॅलीत सहभाग घेऊन मतदारांमध्ये जागरुकता आणण्याचा प्रयत्न केला होता.

बातम्या आणखी आहेत...