आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौन झुकेगा?:आरोप-प्रत्यारोप थांबले, तरी शह-काटशह सुरुच राहणार? ;पण राजकारण वेगळ्या वळणावर जाणार

अमरावती / अनुप गाडगेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात मागील दहा दिवसांपासून सुरू असलेले जाहीर आरोप प्रत्यारोपाचे सत्र अखेर आज (दि. १) संपले. सोमवारी आमदार राणा तर मंगळवारी आमदार बच्चू कडू यांनी विषय संपल्याचे जाहीर केले. हा विषय जाहीररीत्या संपला असल्याचे दिसत असले तरीही हे दोन्ही जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या ताकदवर नेते आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत प्रहार आणि युवा स्वाभिमान पक्ष आपआपली अधिक ताकद आजमवणार आणि यांच्यातील राजकीय शह-काटशह सुरूच राहण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तवण्यात येत आहे. याची सुरूवात अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीतच दिसण्याची दाट शक्यता आहे.

आमदार बच्चू कडू यांनी आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. वास्तविकत: हे अप्रत्यक्षपणे शक्ति प्रदर्शनच असल्याचे बोलल्या जात आहे मात्र, कडू यांनी हे शक्तिप्रदर्शन नाही, असे सांगितले. आज ‘प्रहार’चे राज्यभरातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते अमरावतीत एकत्र आले. त्या ठिकाणी आमदार बच्चू कडू यांचे आक्रमक शैलीतील भाषण आणि मेळाव्या स्थळी आमदार कडू यांचे आक्रमक छायाचित्र असलेले पोस्टर व पोस्टरवरील ‘मै झुकेंगा नही…’ ही आेळ लक्ष वेधून घेत होती. हे सर्व लक्षात घेता ‘प्रहार’ने आज भविष्यातील राजकीय आक्रमकता कायम राहणार असल्याचे दाखवले आहे.

एकीकडे बच्चू कडू यांनी तयारी दाखवून दिली असतानाच बडनेराचे आमदार रवी राणा हे सुद्धा आगामी निवडणुका लक्षात घेता भविष्यातील राजकीय खेळीसाठी तयारीला लागले असतीलच. त्यामुळेच इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत आगामी काळात जिल्ह्यात युवा स्वाभिमान आणि प्रहार यांच्यातील राजकीय द्वंद अधिक जोरदार पहायला मिळू शकते. याचवेळी ‘प्रहार’चे मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल म्हणालेे की, जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीत अचलपूर व मेळघाट मतदारसंघ निर्णायक व महत्वाचे आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात ‘प्रहार’चे आमदार आहेत. त्यामुळे येणारा खासदार हा याच पक्षाचा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आहेत, त्यांचीही मेळघाटात निश्चितच चांगली पकड आहे. २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांना मेळघाटातही भक्कम मतं मिळाली होती.

मात्र, त्यावेळी राजकुमार पटेल हे ‘प्रहार’मध्ये नव्हते. आता मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल असून, ते ‘प्रहार’चे आहेत आणि त्यांनीच येणारा खासदार हा याच पक्षाचा असेल, असा आशावाद व्यक्त केल्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ‘प्रहार’ ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीसोबतच महानगर पालिका निवडणुकीतही ‘प्रहार’ यावर्षी निर्णायक ठरु शकते, असे चित्र तयार होत असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील पक्षनिहाय विधानसभा सदस्यांची संख्या पाहता काँग्रेसनंतर ‘प्रहार’ सर्वांत मोठा पक्ष आहे. कारण जिल्ह्यात काँग्रेसचे तीन तर ‘प्रहार’चे दोन आमदार आहे. या व्यतिरिक्त भाजप व युवा स्वाभिमान पक्षाचा प्रत्येकी एक व एक अपक्ष असे एकूण आठ आमदार आहेत. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे निश्चितच प्रहार व युवा स्वाभिमान पक्षसुद्धा जिल्ह्यात आपले संख्याबळ वाढवण्याच्या तयारीला लागले आहे. आजच्या शक्ति प्रदर्शनातून अप्रत्यक्षपणे तो इशारा बच्चू कडू यांनी इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता युवा स्वाभिमान पक्ष आपली काय राजकीय भूमिका घेणार, याकडे जिल्हाभरातील नागरिकांचे लक्ष लागले.

प्रहारच्या आमदारांची संख्या दहावर पोहोचवायची आहे अमरावती येथे आज झालेल्या ‘प्रहार’च्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांनी सांगितले की, पहिली चूक होती म्हणून आम्ही माफ केले आहे, राणांनी दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे आम्ही आनंद व्यक्त करतो. तसेच आम्ही गांधींजींना मानतो मात्र भगतसिंग सदैव आमच्या डोक्यात असतात. ही आमदार कडू यांच्या भाषणातील आक्रमकता होती. तसेच सद्य:स्थितीत ‘प्रहार’चे दोनच आमदार आहेत. येत्या काळात ही संख्या दहावर पोहचवायची आहे, असेही ते म्हणाले

बातम्या आणखी आहेत...