आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपणातही मनपा माघारलेलीच:50 टक्क्यांचे उद्दीष्ट्यही झाले नाही पूर्ण

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा अर्धा संपला तरी 5 हजार वृक्ष लागवडीच्या उद्दीष्ट्यापैकी महानगर पालिकेद्वारे अजून 50 टक्के वृक्षलागवडही पूर्ण झाली नाही. आतापर्यंत केवळ 1700 वृक्ष लावण्यात आले. त्यामुळे वृक्षारोपणातही मनपा माघारलेलीच आहे. यासाठीही वाहनांमध्ये इंधन नसणे हे प्रमुख कारण पुढे आले आहे.

काही दिवसात 5 हजार वृक्षांची लागवड

येत्या काही दिवसांत 5 हजार वृक्षांची लागवड केली जाईल, अशी माहिती मनपाचे उद्यान अधीक्षक विवेक देशमुख यांनी दिली. मात्र, जे काम वर्षातील आठ महिन्यांमध्ये झाले नाही ते उर्वरित चार महिन्यांत कसे पूर्ण करणार असे विचारले असते त्यांना ठोस उत्तर देता आले नाही.

उद्यान विभागाकडे असलेल्या वाहनांमध्ये इंधनच नसल्यामुळे वृक्षारोपणाचे काम रखडले असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. वृक्षारोपण करण्यासाठी मशीन, ट्रॅक्टर, टँकर या वाहनांची आवश्यकता असते. परंतु, या वाहनांना इंधनच मिळत नसल्यामुळे ते जागच्या जागी उभे आहेत. त्यामुळेच यंदा 5 हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य मनपाला पूर्ण करता आले नाही.

मनपाने गेल्या काही वर्षांत 17 हजार वृक्षांची लागवड केली आहे. त्यांना रस्त्याच्या कडेला, उघडे मैदान, शाळांचे मैदान व उद्यानांमध्ये लावण्यात आले आहे. यापुढे 3500 झाडांची रोपे लावण्याचे नियोजन मनपा करीत आहे. मनपाने गेल्या वर्षी 5 हजार झाडे लावली. त्यापैकी 4 हजार झाडे जिवंत असल्याची माहिती मनपाच्या उद्यान विभागाद्वारे देण्यात आली. परंतु, सणासुदीच्या दिवसांत कशाप्रकारे ते लक्ष्य पूर्ण करणार याबाबत अजुनही नियोजन करण्यात आले नाही.

वाहनांसाठी इंधनाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले

उद्यान विभागासह अन्य विभागांतील वाहनांसाठी इंधन भरण्याची नवी व्यवस्था केली जात आहे. यंदा लक्ष्याच्या 50 टक्केही वृक्षारोपण झाले नसल्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त झाडे लावावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

- डॉ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त, मनपा.

प्रमुखांना स्वत: भरावे लागते इंधन

महानगर पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्यामुळे तसेच निधी अभावी अद्याप जुनीच देयके पेट्रोल पंपांना दिली नसल्याने मनपातील बहुतांश विभाग प्रमुखांना स्वत:च्या पैशातून त्यांच्या वाहनात इंधन भरावे लागत आहे. अशी माहिती खुद्द विभाग प्रमुखांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...