आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडायबेटिस झाला म्हणून खचून न जाता किंवा केवळ औषधोपचारावर न थांबता एका क्रीडाप्रेमी इंजीनिअरने व्यायामाचा मार्ग निवडला आणि त्याद्वारे या आजारावर मात केली. येथील मूळ रहिवासी मंगेश कडू असे या इंजीनिअरचे नाव आहे. पुण्यात स्थायिक असलेल्या मंगेश कडू यांनी 6 महिन्याच्या अथक परिश्रमाने ‘गोवा 70.3 इंटरनॅशनल आर्यन मॅन स्पर्धा’ अवघ्या 6 तास 44 मिनिटात पोहून पूर्ण केली.
मंगेश कडू हे एका मल्टी नॅशनल कंपनीत सस्टेनेबल पॉवर हेड म्हणून कार्यरत आहेत. या स्पर्धेमध्ये 1.9 किलोमीटर सी (समुद्र) स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रनिंग पूर्ण करायचे होते. त्यात 1400 हून अधिक भारतीय आणि परदेशी स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही रेस गोवा मिरमार बीच इथे आयोजित केली गेली. काही वर्षांपूर्वी मंगेश यांना डायबेटिस असल्याचे कळले. परंतु डायबेटिस नियंत्रणासाठी त्यांनी औषधांपेक्षा व्यायामाचा मार्ग निवडला.
दररोज 10 किलो मीटर धाऊन मंगेश यांनी 6 महिन्यांमध्ये तब्बल 12 किलो वजन कमी करून डायबेटिसवर मात केली. त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. पुण्यातील ‘आपलं पुणे फुल मॅरेथॉन’ हे 42 किलोमीटरचे अंतर 4 तास 13 मिनिटात पूर्ण करीत मुंबईची टाटा फुल मॅरेथॉन 42 किमी 4 तास 44 मिनिटात पूर्ण केली. कोल्हापुरचे लोहपुरुष तसेच बर्गमॅनदेखील यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
त्यांच्याच फिटनेस ग्रुपमधील नागरिकांकडून त्यांना गोवा आयर्न मॅनबद्दल कळले. सुरुवातीला त्यांना आर्यन मॅन पूर्ण करण्याचा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे ते आयर्न मॅन रीले यात भाग घेणार होते. पण मग मात्र जिद्दीने आर्यन मॅन स्पर्धा पूर्ण करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी आपले वेळापत्रक बनविले व त्याप्रमाणे सराव सुरू केला.
थंडी असो वा पाऊस वेळापत्रकाप्रमाणे धावणे, पोहणे आणि सायकलिंग सुरू ठेवले. कुठलाही क्रीडाप्रकार असो त्यात समतोल आहार हा हवाच. त्यांनी सर्वांसोबतच आहरालाही तेवढेच महत्व दिले. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीत ते उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे अनेक वेळा त्यांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागत असे. अशावेळी काम आणि सराव करणे ही खरेतर तारेवरची कसरत असते. पण तेव्हा सुद्धा आपले काम पूर्ण करून त्यांनी सराव सुरू ठेवला.
जर्मनीतही पोहले
मंगेश कडू हे सरावासाठी लागणारे शूज, स्विमिंगसाठीचे साहित्य सतत सोबत ठेवतात. कंपनीच्या कामासाठी काही महिन्यांपूर्वी ते जर्मनीला गेले होते. त्यावेळीसुद्धा त्यांनी सरावासाठी स्विमिंग पुल शोधून तेथे सराव केला. सुरुवातीला विशेषत: सी स्विमिंग करणे त्यांना अवघड वाटत होते. दररोज सराव करून त्यांनी त्यावरही प्रभुत्व मिळविले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.