आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 एप्रिलला कळणार कोण मैदानात:उद्यापासून सुरु होणार अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून माघारीचा अंक

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी 28 एप्रिलला होऊ घातलेल्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मैदानातून बाहेर पडण्याची प्रक्रिया 10 एप्रिलपासून सुरु होणार आहे. सुटीचे दिवस वगळता 20 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया चालेल. त्यामुळे नेमके किती जण मैदानात असतील, याचा खुलासा आगामी 21 एप्रिलला होणार आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 संचालकांसाठी ही निवडणूक घेतली जात असून त्यासाठी 191 अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी बहुतेक उमेदवारांनी दोन किंवा त्याहून अधिक अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची संख्या दीडशेच्या आसपास असल्याचे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे.

यापैकी किती जण मैदानातून बाहेर पडतात आणि किती जण कायम राहतात, हे माघारीच्या प्रक्रियेअंती स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान एकूण 212 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी विविध कारणांमुळे 21 अर्ज नाकारण्यात आले होते.

सोसायटी मतदारसंघातून 11, ग्रामपंचायत मतदारसंघातून चार, अडते-व्यापारी मतदारसंघातून दोन आणि हमाल-मापारी मतदारसंघातून एक अशाप्रकारे 18 संचालकांची निवड केली जाईल. यापूर्वी स्वत: शेतकरी ही निवडणूक लढू शकत नव्हते. यावर्षी पहिल्यांदाच त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

विशेष असे की सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघातील प्रत्येकी पाच जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एससी-एसटी, ओबीसी आणि आर्थिक दुर्बल या संवर्गासाठी एकेक जागा राखीव ठेवायची असून दोन जागांवर महिला उमेदवारांची निवड करणे बंधनकारक आहे. हमाल-मापारी मतदारसंघात 550, अडते-व्यापारी मतदारसंघात 1056, तर सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघात प्रत्येकी दीड हजाराच्या आसपास मतदार आहेत.

येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक सचिन पतंगे हे या निवडणुकीसाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. निवडणूक प्राधिकरणाने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार आगामी 20 एप्रिलपर्यंत माघार घेण्यासाठी वेळ देण्यात आला असून 21 एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी घोषित केली जाईल. त्याचदिवशी संबंधितांना निवडणूक चिन्हांचे वितरण केले जाणार असून 28 एप्रिलला मतदान तर दुसऱ्या दिवशी 29 एप्रिल रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

सर्वच राजकीय पक्षांचा सहभाग

सहकार क्षेत्रातील ही निवडणूक अराजकीय म्हटली जात असली तरी सर्वच राजकीय पक्षांनी कृऊबासवर ताबा मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसने सहकार पॅनलच्या नावाखाली सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील बाराही कृऊबासमध्ये उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे खासदार-आमदार राणा दाम्पत्यानेही काही समविचारी सहकाऱ्यांना सोबत घेऊन एक पॅनल गठित केले आहे.