आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामान्सूनपूर्व तयारीचा नुसता फार्स म्हणावा, अशी महावितरणची सद्यस्थिती आहे. जिल्हा व सत्र न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या अतिमहत्वाच्या ठिकाणांपासून ते ज्ञानमाता हायस्कूल, खुद्द विद्युत भवन येथेही मान्सूनपूर्व तयारीचा अभाव असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान मान्सूनपूर्व तयारीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून केवळ पाच टक्के शिल्लक राहिले, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु त्याला दुजोरा मिळावा, अशी वस्तुस्थिती नाही. त्यामुळे रस्त्यावरील सताड उघड्या डीबी (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) नागरिकांसाठी धोकादायक, असे म्हणायची वेळ आली आहे.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी दरवर्षी महावितरणतर्फे जिल्ह्यात मान्सूनपूर्व कामे हाती घेतली जातात. त्यासाठी स्वतंत्र रित्या खासगी यंत्रणाही नियुक्त केली जाते. परंतु या यंत्रणेकडून खरेच कामे करुन घेतली जातात की नाही, याबद्दल शंका आहे. विद्युत खांबांवरील तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या कापणे, लोंबकळणाऱ्या तारांना सुस्थितीत आणणे, वाकलेले खांब दुरुस्त करणे, खांबांवरून दिलेल्या कनेक्शनचे वायर सुस्थितीत आणणे, खांबावरील डीबींना झाकणे बसवणे, ज्या ठिकाणी धोका आहे, अशा खांबांवरील बॉक्सवर तसे लिहिणे आदी कामे या प्रकारात मोडतात. मात्र यापैकी बहुतेक कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत, हे वेगवेगळ्या भागातील नागरिकांनी केलेल्या तक्रारींवरुन लक्षात येते. महावितरणचे रोहित्र असलेल्या डायपोलवर खालच्या भागात मोठाले बॉक्स (डीबी) असतात. असे डायपोल शहरातील बहुतेक रस्त्यांच्या कडेला उभे आहेत. या डायपोलधील बॉक्समध्ये वीज वितरण आणि वहन करण्याबाबतचे अत्यंत गुंतागुंतीचे जाळे असते. वायरची जोडणी, फ्यूज, ग्रीप अशा बऱ्याच बाबींचा येथे अंतर्भाव असतो. त्यामुळे या बॉक्समधील एखाद्या वस्तूला मानवी स्पर्श झाल्यास जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मनुष्यप्राणी नेहमी धोक्यापासून स्वत:चा बचाव व्हावा, असे वागत असतो. परंतु रस्त्यावर अचानक अपघात झाला आणि त्या अपघातानंतर जर एखादा व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या अशा उघड्या डीबीवर फेकला गेला तर धोका टाळायचा कसा? असा नागरिकांचा प्रश्न आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेने ये-जा करणारी गुरे, इतर पाळीव व मोकाट प्राणी, पक्षी नकळत या उघड्या डीबींवर आदळले तर त्यांनाही धोका पोहचू शकतो, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
‘दिव्य मराठी’ने याबाबत शहराच्या काही भागांची पाहणी केली, तेव्हा अत्यंत धक्कादायक चित्र समोर आले. नागरी कामकाजाच्या दृष्टीने मोठे महत्व राखणाऱ्या कार्यालयांकडेही या विभागाने दुर्लक्ष केले आहे. खुद्द महावितरणचे मुख्यालय असलेल्या, विद्युत भवनातील (कॅम्प) कॅन्टीन समोरच्या खांबावरील बॉक्स उघडा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील भिंतीचे शेवटचे टोक, ज्याला लागून पोलिस अधीक्षक कार्यालयाचे प्रवेशद्वार आहे, तेथील डीबी झाकणाविना आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या रिअर गेटला (पाठीमागचे प्रवेशद्वार) लागून असलेल्या डायपोलवरील डीबी केव्हा अपघातास कारणीभूत ठरेल,अशी स्थिती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.