आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची फसवणूक:जिल्ह्यामध्ये बनावट ‘डीएपी’चा सुळसुळाट; गावागावांत विक्री ; खत तयार करणारे रॅकेट सक्रिय

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेती व माती मिसळायची व नामांकीत कंपनीच्या बॅगमध्ये टाकून शेतकऱ्यांना ‘डीएपी’च्या नावावर बनावट खत विक्री करणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाले आहे. हे बनावट खत शेतकऱ्यांना घरपोच व बाजारभावापेक्षा २०० रुपयांनी स्वस्त दिले जात आहे. चार दिवसात या बनावट खताबाबत कृषी विभागाने दुसरी कारवाई केली आहे. मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास कृषी विभागाने खार तळेगाव येथून बनावट ‘डीएपी’च्या ६३ बॅग जप्त केल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या बनावट ‘डीएपी’ची शेतकऱ्यांना विक्री झालेली आहे. मात्र, बनावट खत तयार करणाऱ्यांपर्यंत कृषी विभाग आणि पोलिसांना अजून पोहोचता आले नाही.

खरीप हंगामाची पेरणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. पेरणीच्यावेळी रासायनिक खताची शेतकऱ्यांकडून मागणी राहते. त्यातही ‘डीएपी’ची मागणी सर्वाधिक राहते. यातच मध्यंतरी ‘डीएपी’ची काही ठिकाणी टंचाई निर्माण झाली होती. जिल्ह्यात एक रॅकेट सक्रिय झाले असून, या रॅकेटने ‘डीएपी’ उत्पादनात कधीकाळी ‘ब्रॅन्ड’ असलेल्या ‘सरदार’ या नावाच्या बॅग घेऊन त्यामध्ये माती व रेती मिश्रित खत भरले. तयार झालेले खत शेतकऱ्यांना थेट दारावर जाऊन विक्री केले. बाजारात ‘डीएपी’चा भाव १३५० रुपये असताना या रॅकेटद्वारे शेतकऱ्यांना ११५० रुपये दर तेसुद्धा घरपोहोच मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या ‘डीएपी’ खरेदी केली आहे. या रॅकेटने जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बनावट खत विक्री केले आहे.

या संदर्भात कृषी विभागाला पहिली तक्रार मिळाल्यानंतर १७ जूनला चांदूर बाजार तालुक्यातील माधान येथे कारवाई झाली. यावेळी एका शेतकऱ्याकडून २५ पोते बनावट ‘डीएपी’ जप्त केले होते. या कारवाईनंतर भातकुली तालुक्यातील खार तळेगाव येथील सात शेतकऱ्यांना रॅकेटने ६३ पोते ‘डीएपी’ विक्री केले आहे. तशी शेतकऱ्यांनी तक्रार कृषी विभागाला केली. त्यामुळे कृषी विभागाने मंगळवारी पहाटे खार तळेगावात शेतकऱ्यांकडून हे ‘डीएपी’ ताब्यात घेतले. यावेळी एसएओ अनिल खर्चान, जिल्हा कृषी विकास अधिकारी जी. टी. देशमुख, जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर, दादासो पवार, अश्निी चव्हाण, उद्धव भायेकर, पवन ढोमणे यांनी ही कारवाई केली आहे. माधान व खारतळेगाव येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाला दिलेल्या तक्रारीनुसार, मिलींद वानखेडे (ढंगारखेड) याने बनावट डीएपीची विक्री केली आहे. त्यामुळे कृषी पथकाने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

४ हजार ९०० मे. टन ‘डीएपी’ खत उपलब्ध खरीपासाठी जिल्ह्यात २३१२० मे.टन ‘डीएपी’ची गरज आहे, तशी मागणी नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९५९८ मे. टन खत प्राप्त झाले असून, अजूनही जिल्ह्यात ४ हजार ९०० मे.टन डीएपी साठा शिल्लक असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

‘डीएपी’ किंवा कोणतेही खत खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडून पावती घ्या. तसेच घेतलेले ‘डीएपी’ खरे किंवा खोटे हे बॅग पाहून लक्षात येत नाही. त्यामुळे अशावेळी बॅग फोडून त्यामधील खत हातावर घ्यायचे व त्याला चुना लावून दोन मिनिट चोळायचे. चोळल्यानंतर हातावरील खतातून एकदम गॅस येतो व थोडी फार दुर्गंधी येते. असे झाल्यास ओरिजनल ‘डीएपी’ आहे हे समजावे. मात्र, या दोन्ही कारवाईत जप्त केलेले खत अशाप्रमाणे पडताळणी केले असता त्यामध्ये माती व रेतीच असल्याचे समोर आले. या टोळीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री केली असून, त्यांचा शोध आम्ही व पोलिस घेत आहोत.

^या बनावट खताची विक्री करणारा मिलिंद वानखेडे शेतकऱ्यांना सांगायचा की, आम्ही थेट कंपनीकडून ‘डीएपी ’खरेदी करतो, यामध्ये कोणीही वितरक नाही. तसेच तुम्हाला जीएसटीसुद्धा द्यावा लागत नाही. त्यामुळे बाजारापेक्षा दोनशे रुपये स्वस्त देतो, असे सांगून तो शेतकऱ्यांना बनावट खत विक्री करत होता. -अनिल खर्चान, जिल्हा कृषी अधीक्षक,अमरावती.

स्वतंत्र पथकाद्वारे सखोल तपास करू ^माती व रेतीमिश्रित डीएपीची शेतकऱ्यांना गावागावात सर्रास विक्री सुरू आहे. जिल्ह्यात अनेक गावात हा प्रकार सुरू आहेबनावट खत विक्री प्रकरण गंभीर असून, या प्रकरणात चांदूर बाजारला गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात स्वतंत्र पथकाद्वारे सखोल तपास करण्यात येणार असून, लवकरात लवकर हे रॅकेट पकडण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. -अविनाश बारगळ, पोलिस अधीक्षक.

बातम्या आणखी आहेत...