आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती शिवार:धरणामुळे शेतात पाणीच पाणी, पीक येईना, शेत विकतही कुणी घेईना, अखेर शेतातच तलाव तयार करीत घेतले मत्स्य उत्पादन

अमरावती2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धरणाचे पाणी शेतात पाझरल्याने शेतकऱ्याने शेतातच तयार केलेले तलाव. - Divya Marathi
धरणाचे पाणी शेतात पाझरल्याने शेतकऱ्याने शेतातच तयार केलेले तलाव.
  • दलदलीच्या शेतात मत्स्य‘क्रांती’, झिंग्यांचेही घेतले उत्पादन

(जयश्री देशमुख)

धरणापासून २ किमी दूर असलेल्या शेतात पाणी पाझरत असल्याने सर्वत्र दलदल निर्माण होऊन पीक घेणेही मुश्कील झाले. स्वत:ची १० एकर शेती असूनही इतरांच्या शेतात रोजंदारी करणाऱ्या शेतकऱ्याला एक दिवस आशेचा किरण मिळाला. हातातून गेलेल्या दलदलीच्या शेतात गत ३ वर्षांपासून मत्स्य शेती करीत दरवर्षी किमान २० लाखांचे उत्पादन घेत मत्स्य क्रांती केली. एकेकाळी दलदलीच्या शेतीमुळे हतबल झालेला हाच शेतकरी आज इतरांसाठी प्रेरणा ठरत आहे हे विशेष!

सुदाम खंडारे असे या मत्स्योत्पादक शेतकऱ्याचे नाव असून ते सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी येथील रहिवासी. पूर्णा मध्यम प्रकल्पापासून त्यांची शेती दूर असली तरीही दहा एकराच्या शेतात सर्वत्र दलदलच असल्याने पीकही घेता येत नव्हते. शेती विकायला काढली तर कुणी खरेदी करायलादेखील तयार नाही. परिणामी कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांना रोज मजुरी करण्याची वेळ आली. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांनी केलेले मत्स्य शेतीचे धाडस आज इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. खंडारे यांची शेती कोरडवाहू असली तरी शेतामध्ये धरणाचे पाणी पाझरल्याने सर्वत्र पाणीच पाणी. त्यांचे जगण्याचे एकमेव साधन शेतीच होती. ती विकून दुसरीकडे शेती घ्यावी तर त्या शेतीला कुणी योग्य मोबदलाही देईना. इतरांच्या शेतात रोजंदारी करण्यापेक्षा आपल्याच शेतात काहीतरी करावे हा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देईना. या ध्यासातून मत्स्य शेतीने जन्म घेतला. त्यासाठी अमरावती येथील जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकारी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. दहा एकर शेतात त्यांनी एकूण तीन तलाव तयार केले असून त्यात ते रोहा, कथला आणि मिरगड या माशांचे उत्पादन घेत आहेत. आज त्यांच्या शेतातील माशांचे उत्पादन हे जिल्ह्यासह आजूबाजूंच्या जिल्ह्यांमध्येदेखील विक्रीसाठी जात असून वर्षभर कुटुंबातील तिघांसह एकूण पाच जणांना त्यातून रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. संकटाला घाबरून न जाता त्यातून मार्ग काढणाऱ्या खंडारे यांची संकल्पना शेतकऱ्यांसाठी प्रेरणा ठरत आहे.

असा वाढला व्यवसाय : सुरुवातीला तालुकास्तरावर त्यांनी विक्रेत्यांशी संपर्क साधला. ताजे आणि दर्जेदार उत्पादन तालुक्यातच मिळत असल्याने मासळी विक्रीला वेग आला. असाच वाढता आलेख सुदाम खंडारे यांच्या व्यवसायाचे झाले. लहानांपासून मोठ्या व्यापाऱ्यांनी खंडारेेंशी व्यावसायिक करार केला. मोठी आर्थिक उलाढाल होतेय. केवळ व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता ते स्वत: मासे विक्री करतात.

झिंग्यांचेही घेतले उत्पादन :

खंडारे यांनी या शेततळ्यांमध्ये प्रारंभी झिंग्यांचेही उत्पादन घेतले. मात्र त्यांना हवे असलेले नैसर्गिक खाद्य या मानवनिर्मित तळ्यांमध्ये मिळत नसल्याने कालांतराने त्यांनी झिंग्यांचे उत्पादन घेणे बंद केले.

जाळी टाकून पक्ष्यांपासून करतात माशांचे रक्षण

खंडारे सांगतात, माशांना तीन बाबींचा धोका असतो. त्या म्हणजे पाणी, चोरी व पक्षी. शेतात पाणी मुबलक आहे. चोरांपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्या शेतात रखवालदारांसह कुत्रीही आहेत. पक्ष्यांपासून माशांचे रक्षण करण्यसाठी जाळी बसवली अाहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी ते सौर पॅनलचा उपयोग करतात

.

बातम्या आणखी आहेत...