आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरणाचा हरभऱ्यासह, गव्हाला धोका:हवामानातील बदलामुळे शेतकरी संकटात; पिकांवर महागाड्या औषधांची फवारणी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात काही दिवसांपासून कधी थंडीचा कडाका, दाट धुके, तर कधी ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किडीच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकरी महागड्या औषधाची फवारणी करीत असून त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.

खरीप हंगामातील तुरीचे पीक सध्या सोंगणीला आले असून तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी तुरीची सोंगणी सुरू आहे. त्यामुळे गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, तसेच सध्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू ही पिके बहरली असून हरभऱ्याचे पीक फुलार अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी ते घाट्यावर आले आहे. अशा वेळी वातावरणातील बदलामुळे पिकावर अळ्यांचा व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे यंदा गहू, हरभरा पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

खरिपात सुद्धा अतिवृष्टीचा फटका

आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीचा मोठा फटका सोयाबीन व कपाशीला पिकाला बसला. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक पावसामुळे वाया गेले. अशातच शेतकऱ्यांच्या आशा या रब्बी हंगामातील पिकावर होत्या. मात्र, रब्बी हंगामातील पिकांवर बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे.

.. तर होवू शकते पिकांचे नुकसान

या आठवड्यातील सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. हे वातावरण असेच राहिल्यास रब्बी पिकांचे नुकसान होवू शकते. तुरीवर शेंगमाशी व शेगा पोखरणाऱ्या अळी, तर हरभऱ्यावरील घाटे अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. त्याबाबत विभागाद्वारे तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

- रोशन इंदोरे, तालुका कृषी अधिकारी, नांदगाव खंडेश्वर

वातावरणामुळे रब्बीचा हंगामही हातातून जातोय

ढगाळ वातावरणामुळे तुरीचे 75 क्के नुकसान झाले आहे. थंडीमुळे उभी तूर जळाली. या वर्षी धुक्यामुळे पिकाचे खूप नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याचेदेखील नुकसान झाले आहे. त्यावर आलेल्या रोगामुळे हरभरा पिवळा पडत आहे. गव्हाचीदेखील परिस्थिती काही वेगळी नाही. अतिवृष्टीनंतर आता ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिकही हातातून जाण्याच्या मार्गावर असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात.

बातम्या आणखी आहेत...