आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेंटिलेटरचा दोष:अखेर अहवाल तयार; डफरीनच्या आग प्रकरणी व्हेंटिलेटरचा दोष

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील व्हेंटिलेटरच्या आग प्रकरणाचे ‘थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन’ आटोपले असून यासंदर्भातील अहवाल आज, गुरुवारी उशीरा सायंकाळी जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाला. त्यानुसार आगीचे कारण इनक्यूबेटरला जोडलेल्या व्हेंटिलेटरमध्ये दडले असून, व्हेंटिलेटरच्या आतील इनबिल्ट स्टॅबिलायझर योग्यप्रकारे काम करत नव्हते, असे तज्ज्ञांच्या अहवालात म्हटले आहे.

या अहवालासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी तीन स्वतंत्र यंत्रणा नियुक्त केल्या होत्या. त्यामध्ये नागपूरच्या अग्निशमन प्रशिक्षण महाविद्यालयाच्या चमूसह स्थानिक पातळीवरील विद्युत निरीक्षक कार्यालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांचा समावेश होता. दरम्यानच्या काळात नागपूरच्या अग्निशमन महाविद्यालयाने सदर तपासणी ही फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) यंत्रणेकडून केली जावी व तशी व्यवस्था अकोला येथे असल्याचे कळवले होते. त्यानुसार अकोला येथील बायोमेडिकल यंत्रणेच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या तज्ज्ञांनी गुरुवारी येथे पोहोचून तपासणी केली आणि सायंकाळी लेखी अहवाल सादर केला.

जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाची इलेक्ट्रिकल विंग व व्हेंटिलेटरची पुरवठादार कंपनी यांच्या प्रतिनिधींना पाचारण करुन त्यांच्यामार्फत तपासणी केली होती. मात्र दोन्ही यंत्रणांनी आपापली कामे ‘ओके’ असल्याचे म्हटल्याने जबाबदारी कुणावर निश्चित करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय त्याचवेळी ‘थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन’चा पर्यायही समितीने सुचवला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशीचा निर्णय घेतला.

चौकशी समितीच्या सूत्रानुसार येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासनाच्या अधिपत्याखालील विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात पोहोचून तपासणीचे काम पूर्ण केले होते. दरम्यान आज, गुरुवारी अकोल्याची चमू पोहोचल्यानंतर तिन्ही यंत्रणांनी पुन्हा तपासणी केली. त्यानुसार व्हेंटिलेटर पुरवठादार कंपनीचा दोष असल्याचे पुढे आले आहे. संयुक्त तपासणीनुसार व्हेंटिलेटरमधील इनबिल्ट स्टेबिलायर योग्य नसल्याने त्या दिवशी व्हेंटिलेटरचा भडका उडाला. त्यामुळे पुढे तेथे दाखल असलेल्या ३७ बालकांना इतरत्र हलवावे लागले होते आणि त्यानंतर उशीरा सायंकाळी एका बालकाचा मृत्यू झाला होता.

पालकमंत्र्यांना आज अहवाल सोपवणार
चौकशी समितीचा नवा अहवाल शुक्रवारी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपवला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. आग लागल्यानंतर फडणवीस यांनी लगेच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माहिती घेऊन २४ तासांच्या आत अहवाल मागवला होता.

बातम्या आणखी आहेत...