आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:अखेर बाजार समितीमधील 19 दुकानांचा करारनामा रद्द; बाजार समितीच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात नियमबाह्यरित्या ३३ दुकाने वाटपाचा ठराव करून यातील तब्बल १९ दुकानांचे अत्यल्प दरात वाटप केले होते. त्यामुळे या प्रकरणी उपनिबंधक तथा बाजार समितीचे प्रशासक राजेश लव्हेकर यांनी कारवाई करत तो अनधिकृत ठराव रद्द करून १९ दुकाने परत मिळवली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या मार्केटमधील कापूस बाजार आवारातील ७६ दुकानांपैकी तब्बल ३३ दुकाने कोणत्याही प्रकारची निविदा न काढता प्रत्येकी २ लाख रुपये इतक्या कमी भावाने वाटल्याचा आरोप आहे. याबाबतची तक्रार २७ एप्रिल रोजी माजी संचालक विनोद गुहे यांनी केली होती. परंतु यापूर्वीच जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली होती. विशेष म्हणजे मुदत वाढीत बाजार समितीच्या संचालक मंडळाला कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. असे निर्णय घेण्यापूर्वी शासनाकडून याची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे.

परंतु या प्रकरणात असे न करता तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात किंबहुना प्रशासक बसण्याच्या काही दिवसांपूर्वीच कापूस बाजार आवारातील तब्बल ३३ दुकाने वाटपाचा नियमबाह्यरित्या ठराव घेऊन यातील १९ दुकाने केवळ २ लाखांत देण्यात आली होती. मुळात एका दुकानाची किंमत ८ ते १० लाख रुपये असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे याची चौकशी उपनिबंधक तथा बाजार समितीचे प्रशासक राजेश लव्हेकर यांनी सुरू केली होती. या प्रकरणी १९ दुकानदारांना बोलावून त्यांच्याकडील करारनामा रद्द केला व त्यांच्या मर्जीने हा करार संपुष्टात काढत असल्याचे लिहून घेतले. त्यामुळे बाजार समितीला आता त्यांची दुकाने परत मिळाली असून, या प्रकाराला जबाबदार असल्या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात बाजार समितीच्या सचिवांविरोधात नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात आता कोणाचे बळी जाणार हे येणारा काळच सांगणार आहे.

बातम्या आणखी आहेत...