आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानपरिषदेच्या अमरावती विभागीय मतदारसंघाच्या यादीत नाव व अनुक्रमांक शोधण्यासाठी आता पूर्वीसारखे हजारो नावांमध्ये स्वत:चे नाव शोधण्याचा द्रवीडी प्राणायाम करावा लागणार नाही. सर्च इंजीन नसलेल्या या यादीला आजपासून इंजीनची जोड मिळाल्याने मतदाराला आपले नाव शोधणे एका क्लिकवर शक्य झाले आहे.
‘सर्च इंजीनच नाही, त्यामुळे नाव तरी कसे शोधणार ?’ या मथळ्याखाली ‘दिव्य मराठी’ने गुरुवारच्या अंकात याबद्दलचे वास्तव स्पष्ट केले होते. त्यानंतर झालेल्या वेगवान घडामोडीअंती मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी सर्च इंजीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच सर्च इंजीन हे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीइओ) यांच्या कार्यालयाशी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यामध्ये मतदारसंघ (शिक्षक किंवा पदवीधर), जिल्हा, आडनाव आणि नाव या चार बाबींचा उल्लेख केल्यानंतर संबंधित मतदाराला त्याचे नाव आणि अनुक्रमांक प्राप्त होणार आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक (मतदार नोंदणी) अधिकारी यांच्या कार्यालयासाठी वापरल्या जाणाऱ्या ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला आपले नाव मतदार यादीत समाविष्ट झाले आहे किंवा नाही, याची पडताळणी करुन घेता येते. सर्च इंजीनची सोय नसल्यामुळे पूर्वी या यादीत नाव शोधणे म्हणजे समुद्रात अंगठी शोधण्यासारखे होते. परंतु आता तो त्रास कमी झाला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी अठरा क्रमांकाचा अर्ज भरलेल्या सर्वांना त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली की नाही, झाली असेल तर ती बिनचूक आहेत की नाही, वय, लिंग, पत्ता बरोबर उमटला आहे की नाही. आदी बाबी सहज शोधता येणार आहेत.
विधान परिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाची अंतीम यादी आगामी 30 डिसेंबरला घोषित केली जाणार आहे. या यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी 7 नोंव्हेंबरपर्यंत पहिला टप्पा राबविला गेला. त्या दरम्यान 37 हजार 380 नावे नोंदली गेली. त्या नावांची प्रारुप यादी 23 नोव्हेंबरला प्रकाशित केल्यानंतर 9 डिसेंबरपर्यंत दुसरा टप्पा राबविण्यात आला. या टप्प्यात पुन्हा 12 हजार नवी नावे नोंदली गेली. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या 49 हजाराच्या आसपास झाली आहे. ही एकत्रीत यादी आगामी 30 डिसेंबरला प्रकाशित केली जाईल. त्यासोबतच नाव नोंदविण्यासाठीचा नवा कार्यक्रमही घोषित केला जाणार आहे.
ऑनलाईन पर्याय उपलब्ध नसलेल्या ठिकाणी कागदावरील यादीत नाव शोधावे लागते. मात्र सदर यादीला आद्याक्षराचा (अल्फाबेट) निकष लावण्यात आला नाही. एरवी इंग्रजी वा मराठी आद्याक्षरानुसार नाव शोधले जाते. त्यामुळे त्या यादीत नाव नेमके शोधायचे कसे, असा प्रश्न गाव-खेड्यात राहणाऱ्या मतदारांमार्फत विचारला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.