आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात गुरुवार ५ रोजी सहा विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यात सुदैवाने जिवीत हानी झाली नसली तरी वित्त हानी मात्र झाली आहे. उशिरा रात्री १.३० वाजताच्या सुमारास नमुना गल्लीतील चुन्नू मुन्नू शोरूमपुढील कापडाच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अग्नीशमन विभागाच्या दोन गाड्यांनी दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत १.७५ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालकाने दिली.
सकाळी ८ वाजता मसानगंज येथील घराला आग लागली. यात घरातील फर्निचर व साहित्य असे सुमारे १ लाखाच्या साहित्यांची राख झाल्याची माहिती घरमालकाने दिली. त्यानंतर सकाळी ९ वाजताच्या सुमारास वाहेद खान डीएड काॅलेजजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यात आले.
कडबी बाजार येथील गादी कारखान्यासह भंगाराच्या दुकानाला दु. १.४५ च्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमन विभागाला दीड तास परिश्रम घ्यावे लागले. आगीचे रौद्र रूप बघून खुद्द अग्नीशमन अधीक्षक सय्यद अन्वरही घटनास्थळी पोहोचले. आग विझविण्यासाठी दोन बंबांचा वापर करण्यात आला. या आगीचे कारण कळाले नाही. मात्र आगीत १ लाख ५० हजार रु.चा माल जळून खाक झाला. गादीचा कारखाना व भंगाराच दुकान एकमेकाला लागूनच असून भंगार दुकानाच्या कार्यालयातील काही भागात आग पसरल्याने फर्निचर जळाले. दरम्यान दु. २ वाजता नवी वस्ती बडनेरा येथे जुन्या ऑईल मिलच्या मागच्या बाजुने आग लागली. या ठिकाणीही आग्नीशमन विभागाने दोन गाड्या पाठविल्या व आग नियंत्रणात आणली.
पाचही ठिकाणी लागलेल्या आगीत सुमारे ४ लाख रु.चे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्नीशमन विभागाने वर्तविला आहे. यासोबतच गोपालनगर भागातील खुल्या मैदानातील कचऱ्याला दु. ३.१५ वाजताच्या सुमारास आग लागली. त्या ठिकाणी अग्नीशमन विभागाने बंब पाठवून आग नियंत्रणात आणली. कोणीही जळती वस्तू, काडी कचरा किंवा उघड्यावर टाकू नये असे आवाहन अग्नीशमन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.