आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मनपाने खापर्डेवाडा पाडण्यापूर्वी आमच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी, मगच वाडा पाडावा, अशी मागणी ११ गाळेधारक (भाडेकरू) व्यावसायिकांनी सोमवारी दुपारी १२.३० वाजता श्रमिक पत्रकार भवनात झालेल्या पत्रपरिषदेत केली. सुप्रीम काेर्टाच्या निकालानुसार कलम २६४ अंतर्गत व्यावसायिकांना मनपाने संरक्षण द्यावे, असे निर्देश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शिकस्त वाड्याची मोजणी करण्यात आली. परंतु, इमारतीत आमचे ११ दुकानांचे गाळे आहेत, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत करून घेतले आहे. त्यात ही इमारत उत्तम स्थितीत असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. त्यामुळे जर ही इमारत पाडायची असेल तर आधी आमच्या उदरनिर्वाहाची सोय करून नव्याने बांधल्या जाणाऱ्या इमारतीत आम्हाला कुठे जागा मिळेल, याचीही हमी देण्यात यावी, कारण सुप्रीम कोर्टाचा तसा आदेशच आहे, अशीही मागणी पत्रपरिषदेत केली.
आम्ही ११ गाळेधारक मागील १३ वर्षांपासून लढा देत आहोत. उच्च व सर्वोच्च न्यायालयात आम्ही न्याय मागितला. खापर्डे वाड्याचे अ व ब असे दोन भाग केले आहेत. राजकमल चौकात दर्शनी भागात ज्या ठिकाणी दुकानांचे गाळे आहेत तो अ भाग असून सुस्थितीत आहे. तर ब भाग हा जुन्या खापर्डे वाड्याचा आहे. जुना वाडा व दुकानांचे गाळे यामध्ये १५ फुटांचे अंतर आहे. मनपाद्वारे संपूर्ण जागेचेच मोजमाप करण्यात आले. त्याची सर्टिफाईड काॅपी आम्हाला दिली नाही. ते देण्यात यावी, अशी मागणीही पत्रपरिषदेत गाळेधारक बबन रडके, श्याम जुनघरे, विकास पाध्ये, विजय लिमये, सागर सरदार, विनोद रायगावकर, सुधाकर पुंड व सचिन सरोदे यांनी केली.
विद्युत पुरवठा खंडित करण्यास विरोध महावितरणच्या राजकमल येथील सहायक अभियंत्यांनी १ एप्रिल रोजी खापर्डे वाड्यातील गाळेधारक व्यावसायिकांना विद्युत पुरवठा खंडित केला जाणार असे लेखी कळवले. परंतु, मनपाची कारवाई अद्याप पूर्ण झाली नसताना तसेच गाळेधारकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याबाबत मनपाला सुप्रीम कोर्टाने आदेश दिले असताना त्यापूर्वी जर विद्युत पुरवठा खंडित केल्यास तो न्यायालयाचा अपमान ठरेल, असेही पत्र गाळेधारकांनी महावितरण सहायक अभियंत्यांना पाठवले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.